नागपुरात उद्या महासोहळा, ठिक-ठिकाणी शिंदे-भाजपचे झेंडे, पंतप्रधानांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं उद्घाटन, काय Updates?
समृद्धी महामार्गाचा झिरो माईल ते वायफळ टोल नाकापर्यंत भव्य सजावट करण्यात आली आहे.
नागपूरः महाराष्ट्रासाठी बहुप्रतिक्षित समृद्धी महामार्गाचं (Samruddhi High way) उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. यानिमित्त नागपुरात (Nagpur) महासोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्यातील महामार्गाचं लोकार्पण होत आहे. या कार्यक्रमाची नागपूर शहर आणि परिसरात जय्यत तयारी सुरु आहे. उद्घाटन सोहळ्याच्या परिसरात शिंदे-फडणवीस यांचे मोठे बॅनर्स लावण्यात आले आहेत. या सोहळ्याला अनेक मंत्री-आमदार आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित राहतील.
समृद्धीचा झिरो माईल ते वायफळ टोल नाकापर्यंत भव्य सजावट करण्यात आली आहे. नागपूरमध्ये सुमारे १० किलोमीटरपर्यंत भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटाचे झेंडे फडकवण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास समृद्धी महामार्गावरून प्रवास करणार आहेत.
नागपूर रेल्वे स्टेशनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या वंदे भारत रेल्वेला हिरवी झेंडी दाखवली जाणार आहे. यामुळे नागपूर स्टेशनवरही रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली आहे.
नागपूर रेल्वे स्टेशनची ऐतिहासिक वास्तू सजावण्यात आली आहे. रविवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन होईल. यावेळी ते नागपूर-विलासपूर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील.
शिर्डीतही जोरदार तयारी
समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणाची शिर्डीतही भव्य तयारी करण्यात आली आहे. इंटरचेंजच्या ठिकाणी विशाल असे सभामंडप उभारण्यात आले आहे. नागपूरच्या उद्घाटन सोहळ्याचं थेट प्रक्षेपण शिर्डीत दाखवण्यात येणार आहे.
विकासगंगा आली हो अंगणीययय अशा मजकुराचे भव्य बॅनर्स शिर्डीत लावण्यात आले आहेत. त्यावर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांचे फोटो आहेत.