उद्धव ठाकरे असे काय बोलून गेले, भाजप कार्यकर्ते प्रचंड संतप्त, फाडले उद्धव ठाकरे यांचे बॅनर
uddhav thackeray devendra fadnavis : नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली. या टीकेनंतर भाजप कार्यकर्ते अन् नेते चांगलेच आक्रमक झाले आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांचे बॅनर फडले आहे.
नागपूर : राज्यातील राजकारणात टीकेची पातळी घसरत चालली आहे. राज्यात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर अनेक राजकीय भूंकप बसले आहे. त्यामुळे सर्वच पक्षातील नेत्यांकडून टीका करताना कोणतेही भान राखले जात नाही. वैयक्तीक आरोप-प्रत्यारोप अन् टीका केली जात आहे. या प्रकारासंदर्भात राज्यातील अनेक ज्येष्ठ राजकीय नेत्यांनी नाराजीसुद्धा व्यक्त केली आहे. त्यानंतर त्या नेत्यांना आपल्याच पक्षातील लोकांवर कारवाई करता आली नाही. यामुळे आरोप-प्रत्यारोपांचा फैरी सुरु आहे. आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. यामुळे भाजप कार्यकर्ते प्रचंड संतप्त झाले.
काय म्हणाले उद्धव ठाकरे
शिवसेना नेते उद्धव ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात त्यांनी सोमवारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची एक जुनी ऑडिओ क्लिप ऐकवली. त्यात देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते की, एकवेळ भाजप सत्तेत राहणार नाही, परंतु राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करणार नाही. त्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की “अरे काय तुमच्या नागपूरला कलंक आहे हा”. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना कलंक म्हटले. त्यामुळे भाजप कार्यकर्ते चांगलेच संतप्त झाले.
भाजप कार्यकर्त्यांनी फडले बॅनर
देवेंद्र फडणवीस यांना कलंक म्हटल्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते चांगलेच संतप्त झाले. उद्धव ठाकरे यांच्या पोस्टरवर काळोख लावला. त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नागपुरात लावले बॅनर फाडले. तसेच उद्धव ठाकरे मुर्दाबाद, हाय हाय… या घोषणा देत आंदोलन केले. उद्धव ठाकरे यांनी घरी जाऊन आपला स्वत:चा चेहरा आरश्यात पाहवा, त्यानंतर कोण कलंक आहे, हे समजेल, असे भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.
भाजप नेते आक्रमक
उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर राज्यभरात भाजप आक्रमक झाला आहे. भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला आहे. त्यांनी म्हटले की, कलंक शब्दाचं दुसरं नाव म्हणजे उध्दव ठाकरे आहे. उध्दव ठाकरे यांनी एकदा आरशात बघावे, तुमचं तोंड पालघरच्या साधुंच्या रक्तानं बरबटलंय आहे. हात मनसुख हिरेनच्या रक्तानं माखलेत आहेत. मातोश्रीची तिजोरी कोविड घोटाळ्याच्या पैशांनी भरलीय. स्वार्थापायी सख्ख्या भावाला तुम्ही घरातून काढलं. तुम्ही कलंकाची भाषा करताय? असा सवाल भोसले यांनी केला आहे.