Nagpur ZP Election : अनिल देशमुख नॉट रिचेबल, जिल्हा परिषद कोणाच्या नेतृत्त्वात लढायची, राष्ट्रवादीला टेन्शन!
नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणूक कुणाच्या भरवशावर लढायची? राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार कोण करणार? निवडणुकीत खर्च कोण करणार? बंडखोरांना शांत कोण करणार? माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गैरहजेरीमुळे नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पडलेले हे प्रश्न.
नागपूर : नागपूर राष्ट्रवादी काँग्रेस (Nagpur NCP) म्हणजे अनिल देशमुख, (Anil Deshmukh) हेच समीकरण गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु आहे. प्रत्येक निवडणुकीत अनिल देशमुख यांची भूमिका महत्त्वाची असते, पण सध्या अनिल देशमुख 100 कोटी वसुलीप्रकरणात नॅाट रिचेबल असल्याने, नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत (Nagpur ZP Election) राष्ट्रवादीचा वाली कोण? हा कार्यकर्त्यांपुढे सर्वात मोठा प्रश्न आहे.
नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणूक कुणाच्या भरवशावर लढायची? राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार कोण करणार? निवडणुकीत खर्च कोण करणार? बंडखोरांना शांत कोण करणार? माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गैरहजेरीमुळे नागपूर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पडलेले हे प्रश्न.
अनिल देशमुख नॅाटरिचेबल असल्याने निवडणुकीत कार्यकर्ते वाऱ्यावर असलेल्यांची अनेकांची भावना आहे. निवडणूक प्रचारात अनिल देशमुख नसल्याने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचं टेन्शन वाढलं आहे. अशा संकटाच्या स्थितीत माजी मंत्री रमेश बंद कार्यकर्त्यांना धीर देताना दिसत आहे. ‘ही निवडणूक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या भरवशावर लढवणार’ असं माजी मंत्री रमेश बंग यांनी सांगितलंय.
नागपूर जिल्हा परिषदेच्या 16 तर पंचायत समितीच्या 31 जागांवर ही पोटनिवडणूक होणार आहे. ओबासी आरक्षणाशिवाय ही पोटनिवडणूक होत आहे, त्यामुळे सर्वच पक्षांसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. या निवडणुकीत एकीकडे भाजपचे दिग्गज नेते मैदानात असताना, अनिल देशमुख यांची अनुपस्थिती राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशा आणणारी आहे. त्यामुळेच या पोटनिवडणुकीत अनिल देशमुखांच्या अनुपस्थितीचा राष्ट्रवादीला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
नागपुरात नव्या प्रभारचनेमुळे 15 नगरसेवक वाढण्याची शक्यता
नागपूर महापालिकेतील नगरसवेकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. नव्या प्रभागरचनेत नगरसेवकांची संख्या वाढणार असल्यानं 15 नगरसेवक वाढण्याची शक्यता आहे. नागपूर महापालिकेत सत्ताधारी भाजपनं सत्ता राखण्यासाठी तयारी सुरु केलीय. तर, विरोधी काँग्रेसनं देखील निवडणुकीसाठी तयारी सुरु केलीय. नगरसेवकांची संख्या वाढणार असल्यानं दोन्ही पक्षातील इच्छुकांमध्ये देखील वाढ होणार आहे.
5 जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक
धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा स्थगित केलेला निवडणूक कार्यक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान घेण्यात येणार आहे; तसेच पालघर जिल्हा परिषदेच्या व त्यांतर्गतच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठीदेखील त्याच दिवशी मतदान होईल आणि सर्व ठिकाणी 6 ऑक्टोबर 2021 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली.
ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर आता राज्यातील 5 जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक होणार आहे. राज्य निवडणूक आयोगानं ही घोषणा केलीय. 5 ऑक्टोबरला मतदान तर 6 ऑक्टोबरला मतमोजणी होणार असल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. मात्र, ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत राज्यात कुठल्याही निवडणुका नको अशी भूमिका विरोधी पक्ष असलेल्या भाजपसह सत्ताधारी महाविकास आघाडीने घेतली आहे. मात्र, आता निवडणुका घोषित झाल्यामुळे सर्व राजकीय पक्ष काय भूमिका घेणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
पुढील वर्षी 15 महापालिकांच्या निवडणुकांची शक्यता
राज्यात पुढच्या वर्षी मुंबईसह 15 महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या महापालिकेत प्रभाग पद्धती कशी असावी, तसेच नगरपंचायत आणि नगरपालिकांमध्ये प्रभाग पद्धत कशी असावी यावर आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. 15 पैकी मुंबई महापालिकेत सध्याची एक प्रभाग पद्धत कायम राहणार आहे. उरलेल्या महापालिकेत दोन की चार प्रभाग पद्धती असावी यावर आजच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर यासह काही महापालिकेत दोन सदस्य प्रभाग पद्धत रहावी अशी काही नेत्यांची भूमिका आहे. नगरपंचायतीत एक सदस्य प्रभाग पद्धत, तर नगरपालिकांमध्ये दोन सदस्य प्रभाग पद्धत असण्याची शक्यता आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या या प्रस्तावावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या
नागपुरातील राजकारण्यांना अच्छे दिन, नव्या प्रभारचनेमुळे 15 नगरसेवक वाढण्याची शक्यता