मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कोण? नाव ठरलं, रात्री 11 वाजता घोषणेची शक्यता
नवी दिल्ली : मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे. सत्ता स्थापनेचा दावाही काँग्रेसने राज्यपालांना भेटून केला आहे. मात्र, अजूनही मुख्यमंत्रिपदाचं नाव ठरत नव्हतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. कमलनाथ हेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्र्यांची घोषणा कधी आणि कुठे होणार? […]
नवी दिल्ली : मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे. सत्ता स्थापनेचा दावाही काँग्रेसने राज्यपालांना भेटून केला आहे. मात्र, अजूनही मुख्यमंत्रिपदाचं नाव ठरत नव्हतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. कमलनाथ हेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मुख्यमंत्र्यांची घोषणा कधी आणि कुठे होणार?
आज रात्री 11 वाजता मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली जाईल, अशीही माहिती मिळते आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्येच मुख्यमंत्रिपदाची घोषणा केली जाईल, असेही कळते आहे.
कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे या दोन नेत्यांची नावं मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. त्यापैकी कमलनाथ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दोन्ही नेत्यांशीच चर्चा केल्यानंतर राहुल गांधी यांनी दोघांसोबत फोटो ट्वीट केला आणि हे दोन्ही नेते ‘धैर्य आणि वेळ’ या दोन्हीत सर्वात मोठे योद्धे असल्याची पावती दिली.
The two most powerful warriors are patience and time.
– Leo Tolstoy pic.twitter.com/MiRq2IlrIg
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 13, 2018
मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची बाजी
मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने बाजी मारली आहे. ईशान्य भारतात हातात असलेलं एकमेव राज्य गमावलं असलं तरी हिंदी भाषिक तीन राज्यांमध्ये काँग्रेसने भाजपला चितपट केलंय. छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान ही तीन राज्य काँग्रेसने भाजपच्या ताब्यातून हिसकावून घेतली आहेत. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसने बहुमत मिळवलंय, तर मध्य प्रदेशात इतर पक्षांची मदत काँग्रेसला घ्यावी लागणार आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर मध्य प्रदेशातील चित्रही स्पष्ट झालं. मध्य प्रदेशात गेल्या 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपला 109 जागांवर समाधान मानावं लागलं आहे.
मध्य प्रदेश (230) :
- काँग्रेस – 114
- भाजप -109
- बसपा – 02
- सपा – 01
- इतर – 04
दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने 11 डिसेंबरच्या रात्रीच राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. सर्वात मोठा पक्ष या नात्याने सत्तास्थापनेची संधी देण्यात यावी, असं काँग्रेसने म्हटलं आहे.
कोण आहेत कमलनाथ?
विद्यमान मध्य प्रदेशचे काँग्रेस अध्यक्ष कमलनाथ हे काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. त्यांचं शिक्षण दून स्कूलमध्ये झालं. 1980 मध्ये पहिल्यांदा खासदार झाले. मध्य प्रदेशातील छिंदवाडा लोकसभा मतदारसंघातून ते आतापर्यंत तब्बल आठ वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत.
मे 1996 मध्ये सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर हवाला प्रकरणात कमलनाथ यांचं नाव आल्याने निवडणूक लढता आली नाही. या परिस्थितीमध्ये त्यांच्य पत्नी अलका कमलनाथ यांनी निवडणूक लढवली आणि त्या निवडून आल्या. 1997 च्या पोटनिवडणुकीत कमलनाथ मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांच्याविरुद्ध लढले मात्र, या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला.
कमलनाथ पहिल्यांदा 1991 साली वन आणि पर्यावरण मंत्री बनले. त्यांनी वस्त्रोद्योग राज्यमंत्री, केंद्रीय उद्योग मंत्री, केंद्रीय परिवहन मंत्री, शहर विकास मंत्री, संसदीय कामकाज मंत्री अशा जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
कमलनाथ यांच्यावर सहा महिन्यांपूर्वीच प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती आणि त्यांनी ती यशस्वीपणे पेलली. 15 वर्षांपासून मध्य प्रदेशात वनवासात असलेल्या काँग्रेसला त्यांनी अच्छे दिन आणले. कमलनाथ यांना प्रत्येक वर्गात मानलं जातं.