मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दिवंगत नेते राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर होत असलेल्या निवडणुकीत भाजपने दिलेला उमेदवार मागे घेण्याची विनंती थोरात आणि पटोले यांनी फडणवीसांकडे केली. त्यामुळे भाजप काँग्रेसच्या विनंतीला मान देऊन संजय उपाध्याय यांचा अर्ज मागे घेणार का, याकडे राज्याचं लक्ष लागलंय.
काँग्रेसने रजनी पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. रजनी पाटील यांच्या विरोधातील उमेदवारी अर्ज भाजपनं मागे घ्यावा ही विनंती करण्यासाठी नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी चंद्रकांत पाटीलही तिथे उपस्थित होते.
महाराष्ट्राची परंपरा राहिलीय की निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर विरोधात उमेदवार दिला जात नाही. त्यामुळे भाजपनं अर्ज मागे घ्यावा ही विनंती आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आम्हाला खात्री आहे की आमच्या विनंतीचा मान ठेवला जाईल, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तर संघटनेत चर्चा करुन फडणवीस निर्णय घेतील असं त्यांनी सांगितल्याचं देखील पटोलेंनी स्पष्ट केलं.
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस रजनी ताई पाटील यांनी 22 सप्टेंबर रोजी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत दाखल केला. या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आदी नेते उपस्थित होते.
महाराष्ट्रातून राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेसनं उमेदवाराची घोषणा केलीय. रजनी पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलीय. राजीव सातव यांच्या निधनानं एक जागा रिक्त झाली होती, त्यांच्या जागेवर आता रजनी पाटील निवडणूक लढवतील. रजनी पाटील ह्या सध्या जम्मू आणि काश्मीरच्या काँग्रेस प्रभारी आहेत. त्या आधीही राज्यसभेवर होत्या. त्यानंतर आता त्यांना पुन्हा संधी देण्यात आलीय. विशेष म्हणजे विधान परिषदेसाठीही राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीतही रजनी पाटील यांचं नाव आहे. तो निर्णय अजून राज्यपालांकडे प्रलंबित आहे. त्याच पार्श्वभूमीवर रजनी पाटील यांना उमेदवारी दिली गेलीय.
महाराष्ट्रातून राज्यसभेच्या जागेबाबत भाजपकडून कोण लढवणार? याबाबतचा सस्पेन्स संपुष्टात आला आहे. भाजपकडून संजय उपाध्याय निवडणूक लढणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे. राज्यसभा भाजप लढणार आहे. मुंबई भाजपचे सरचिटणीस संजय उपाध्याय हे आमचे राज्यसभेचे उमेदवार असतील. 22 तारखेला सकाळी 11 वाजता ते फॉर्म भरायला जाणार आहेत, अशी घोषणा पाटील यांनी केली.
काँग्रेसनं राजीव सातव यांना राज्यसभेवर पाठवलं होतं. राजीव सातव यांना कोरोनासंसर्ग झाल्यानं पुण्याच्या जहांगीर रुग्णालयात राजीव सातव यांच्यावर उपचार करण्यात येत होते. मात्र, 16 मे रोजी राजीव सातव यांचं कोरोनामुळं निधन झालं. त्यांच्या निधनामुळं राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे
हे ही वाचा :
मुंबई पालिकेवर डोळा? भाजपकडून राज्यसभा लढण्याची घोषणा, कोण आहेत उमेदवार संजय उपाध्याय?
Rajya Sabha : राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसचा उमेदवार जाहीर, रजनी पाटील यांच्या नावाची घोषणा