मुंबई : विधानसभेच्या अध्यक्षपदाची (Legislative Assembly Speaker) निवड डिसेंबर महिन्यात होत असलेल्या हिवाळी अधिवेशनातच (Winter Session) होईल व अध्यक्ष काँग्रेस पक्षाचाच होईल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी स्पष्ट केले आहे. टिळक भवन येथे प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना पटोले यांनी ही माहिती दिली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत झालेल्या अधिवेशनाचा कालावधी कमी होता. अधयक्षपदाच्या निवड प्रक्रियेसाठी तीन दिवसांचा कालावधी लागतो त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवड आतापर्यंत झाली नाही. हिवाळी अधिवेशनात मात्र विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड होईल व ती आवाजी मतदानाने होईल. आवाजी मतदानाने निवड होण्याची पद्धत देशभर सर्वच राज्यात आहे त्यात काही गैर नाही. विधानसभेने त्यांच्या नियमावलीत बदल केलेला आहे. महाराष्ट्रातही विधान परिषदेच्या सभापतीपदाची निवड याच पद्धतीने होत असते त्यामुळे यावर आक्षेप घेण्याचे काही कारण नाही, असं पटोले म्हणाले.
अमरावती दंगलीप्रकरणी फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेल्या आरोपासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला पटोले यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की, अमरावती दंगलीत भाजपाचे आमदार व नेतेच सक्रीय होते, भाजपाच्या नेत्यांनीच चिथावणी देणारी विधाने केली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर अमरावती दंगलीचे खापर फोडणे चुकीचे आहे. राहुल गांधी यांची बदनामी करण्याचा हा प्रयत्न आहे व असा प्रयत्न भाजपाकडून सातत्याने होत आहे. राहुल गांधी यांच्याविषयी बोलण्याचा फडणवीस यांना नैतिक अधिकार नाही. गांधी कुटुंबाने देशासाठी त्याग केला आहे, बलिदान दिले आहे, भाजपाने देशासाठी काय केले, असा प्रश्न उपस्थित करून देश विकणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, अशा शब्दात पटोले यांनी फडणवीसांवर पलटवार केलाय.
भीमा-कोरेगावमध्ये जे साहित्य मिळाले त्यात चीन, आयएसआय हे कशी मदत करत होते हे पोलिसांनी सिद्ध करुन अशा डाव्या विषवल्लीचा बुरखा फाडला आहे. त्याचप्रमाणे राहुल गांधी यांच्या ट्विटनंतर राज्यातील अमरावतीत हिंसाचार झाल्याचा गंभीर आरोप फडणवीस यांनी काल केला होता. अमरावतीत मोठा हिंसाचार झाला. त्रिपुरात ज्या गोष्टी झाल्याच नाहीत त्या पसरवल्या गेल्या. त्रिपुरात सीपीआयच्या इमारतीला आग लागली, त्याचा फोटो मशिदीच्या नावाने व्हायरल केला गेला. दिल्लीत पुस्तकं जाळती तर त्याचे फोटो कुराण जाळलं म्हणून व्हायरल केले गेले. यांची इकोस्टिस्टिम आहे. एकाने ट्विट केलं की दुसऱ्याने करायचं, अशा पद्धतीने अल्पसंख्यांकांवर कसे अत्याचार होत आहेत याचं नरेटिव्ह तयार केल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला आहे.
इतर बातम्या :