दरेकरांनी आडनाव बदलून दरोडेखोर ठेवावं, नाना पटोलेंचा खोचक सल्ला
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात मुंबई सहकारी बँक प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दरेकरांवर खोचक टीका केली आहे.

मुंबई: विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांच्याविरोधात मुंबई सहकारी बँक प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी दरेकरांवर खोचक टीका केली आहे. मुंबई सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी बँकेचे माजी अध्यक्ष, विद्यमान संचालक व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा हा कायदेशीरच आहे. बँकेवर दरोडा टाकणाऱ्या दरेकर (mumbai bank) यांनी आता आडनाव बदलून दरोडेखोर असे करावे, असा खोचक सल्ला नाना पटोले यांनी दरेकर यांना दिला आहे. मुंबई सहकारी बँकेची लूट करण्यात आली. लेखापरिक्षण अहवालात तसे स्पष्ट झाले आहे. सहकार विभागाला कारवाई करण्याचा अधिकार आहेत, त्यानुसार सहकार विभागाने ही कारवाई केलेली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाई होते तेव्हा करेल तो भरेल असे म्हणणारे भाजपाचे नेते आता दरेकर प्रकरणावरून विनाकारण टीका करत आहेत. ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने केलेली नाही, असे पटोले यांनी स्पष्ट केलं.
नाना पटोले यांनी मीडियाशी संवाद साधताना हा खोचक सल्ला दिला. यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राज्यपालांवरही टीका केली. विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक याच अधिवेशनात पार पडावी यासाठी महाविकास आघाडीमधली तीन्ही पक्षांची चर्चा झाली आहे. सरकारच्यावतीने राज्यपाल यांना तसे पुन्हा कळवण्यात येईल. परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल राहिले नसून ते ‘भाजप’पाल झाले आहेत, त्यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या?, असा सवाल पटोले यांनी केला आहे.
आमचा उमेदवार निश्चित, पण
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनातच व्हावी यासाठी महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल महोदयांना भेटून त्यासंदर्भात कळवण्यातही आलेले आहे. परंतु अद्याप राजभवनवरून अध्यक्षपदाच्या निवडणुक कार्यक्रमासंदर्भात प्रतिसाद आलेला नाही. आघाडीतील तीन्ही पक्षांनी याविषयी चर्चा केली आहे, सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास करून राज्यपाल महोदयांना पुन्हा याबाबत संदेश दिला जाईल. आमचा उमेदवार निश्चित झालेला आहे, एकदा का निवडणुक प्रक्रिया सुरु झाली की नावही जाहीर करू, असे पटोले म्हणाले.
संबंधित बातम्या:
VIDEO: फडणवीसांनी आमचं संभाषण चोरासारखं ऐकलं, अनिल गोटेंची पोलीस आयुक्तांकडे तक्रार