विधानसभेला अध्यक्ष मिळू नये, ही भाजपची भूमिका, नाना पटोलेंची टीका, राज्यपाल भाजपची बी टीम?
विधीमंडळात केलेल्या नियम घटनाबाह्य असल्याचा आक्षेप राज्यपालांनी नोंदवला होता. मात्र हे नियम कसे बरोबर आहेत, हे त्यांना पटवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न काँग्रेस नेते आणि महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात आल्याचंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
मुंबई : विधानसभेला अध्यक्ष मिळू नये, अशी भाजपची (BJP) भूमिका असल्याचा टोला काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी लगावला आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर (Cabinet Meeting) आता पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंह कोशारी (Bhagat Singh Koshyari) पत्र पाठवण्यात आलं असल्याची माहिती नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
भाजपवर घणाघात!
काँग्रेस नेत्यांनी रविवारी राज्यपालांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांना आज पुन्हा पत्र पाठवण्यात आलं आहे. यावर अजूनतरी राज्यपालांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नसल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय. दरम्यान, जर राज्यपालांची पत्रावर प्रतिक्रिया आली नाही, तर संविधानिक पद्धतीनं जे काही आम्हाला करता येणं शक्य आहे, ते सगळंकाही आम्ही करु, असंही नाना पटोले यांनी म्हटलंय. त्याचप्रमाणे राज्यपालांच्या आडून विधानसभेला अध्यक्ष मिळू नये, अशी भाजपची भूमिक असल्याचा घणाघाती आरोप नाना पटोले यांनी यावेळी केला.
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदान पद्धतीनेच होईल आणि उद्याच ही निवडणूक घेण्याचा सरकारचा मानस असून अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदानाने घेण्याचा जो निर्णय घेतला आहे तो घटनाबाह्य नसल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय.
नाना पटोले यांनी म्हटलंय की,…
नियम बदलण्याचे अधिकार विधिमंडळाला आहेत, त्यानुसार अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीचे नियम बदल करण्यात आले आहेत. आवाजी मतदानाने अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची परंपरा लोकसभेतही आहे तीच प्रक्रिया महाराष्ट्राने स्विकारलेली आहे. इतर राज्यातही तीच परंपरा पाळली जाते. महाराष्ट्रातही विधान परिषद सभापतींची निवडणूक आवाजी पद्धतीनेच होते. त्यामुळे विधिमंडळाने घेतलेला निर्णय घटनाबाह्य नसून तसे पत्र राज्यपालांना पाठवले जाईल.
राज्यपालांचं काय म्हणणंय?
जे नियम विधानसभा चालवण्यासाठी लागतात, त्यानुसारच विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी सर्व कार्यवाही केली जात असल्याचा दावा नाना पटोले यांनी केला आहे. दरम्यान, विधीमंडळात केलेल्या नियम घटनाबाह्य असल्याचा आक्षेप राज्यपालांनी नोंदवला होता. मात्र हे नियम कसे बरोबर आहेत, हे त्यांना पटवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न काँग्रेस नेते आणि महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात आल्याचंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे. राज्यपालांनी विधानसभेच्या कामकाजात सरकारला सहकार्य करावी, अशी विनंती देखील नाना पटोले यांनी यावेळी केली.
कॅबिनेट बैठकीनंतर पुन्हा पत्र
कॅबिनेट बैठकीनंतर राज्यपालांना पुन्हा पत्र पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहितीही नाना पटोले यांनी यावेळी दिली. यासोबत सगळ्या घटनात्मक प्रक्रिया पाहून उद्या चित्र स्पष्ट होईल, असंही त्यांनी म्हटलंय. घटनादुरुस्तीमध्ये आवाजी मतदानाची प्रक्रियाच वापरली जाते. विधानपरिषदेतची सभापतींची निवड आवाजी मतदानंच केली जाते, असंही नाना पटोले यांनी यावेळी नमूद केलंय. दरम्यान, आता उद्या नेमकं विधानसभेला अध्यक्ष मिळतो का, याकडे संपूर्ण राज्याची नजर लागली आहे.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरायचा होता. मात्र विधानसभा अध्यक्षपदासाठी नियम बदलण्यात आले आणि ही प्रक्रियाच घटनाबाह्य असल्याचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सरकारला कळवलं. त्यामुळे आघाडीला मोठा धक्का बसला असून अध्यक्षपदाची निवडणूक रेंगाळणार, अशी शक्यता निर्माण झाली आहे. उद्या बाबत अधिक चित्र स्पष्ट होईल, अशा विश्वास नाना पटोलेंनी व्यक्त केलाय.
विधानसभा अध्यक्षाच्या निवड प्रक्रियेबाबत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला पत्रं पाठवून उत्तर दिलं होतं. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नियम बदलची प्रक्रिया घटनाबाह्य असल्याचा उल्लेख राज्यपालांनी पत्रात केला होता. त्यामुळे उद्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार की नाही याबाबतची साशंकता निर्माण झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा राज्यपालांना पत्र लिहून राज्य सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
इतर राजकीय बातम्या –
त्यावेळेस फडणवीसांनी किती बिस्किटं खायला घातली होती, जाधवांच्या सवालावर पुन्हा विधानसभेत गदारोळ
तो चाऊन येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव, विधानसभेत पुन्हा गदारोळ, जाधवांचे भाजपला खडे सवाल