Nanded Politics| नायगाव, अर्धापुरातले नगराध्यक्ष ठरले, माहूरात महाविकास आघाडीत बिघाडी?
नांदेडमध्ये तीन नगरपंचायतींमध्ये यंदा निवडणूक झाली होती. त्यापैकी नायगाव आणि अर्धापूरात काँग्रेसचा वरचश्मा असल्याने तेथे नगराध्यक्ष पद निवडीचे चित्र स्पष्ट असून माहूरमध्ये मात्र महाविकास आघाडी असल्याने तेथे मतभेद दिसून येत आहेत.
नांदेड: जिल्ह्यातील नायगाव, अर्धापूर आणि माहूरमधील नगर पंचायत निवडणुकांनंतर (Nagar Panchayat Election)आता येथील नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पद निवडीची प्रक्रिया सध्या सुरु आहे. त्यापैकी माहूर (Mahoor) नगर पंचायत नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करताना अखेरपर्यंत महाविकास आघाडीत एकमत झाले नसल्याचे चित्र पहायला मिळाले. काल 8 फेब्रुवारी रोजी माहूर नगर पंचायतमधील नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि शिवसेनेकडून चार नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले. अर्धापूर आणि नायगाव (Ardhapiur And Naigaon) येथे मात्र नगराध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज आल्यामुळे याठिकाणी आता केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे.
माहूरमध्ये नेमकं कुठे बिघडलं?
माहूर नगरपंचातीत राष्ट्रवादीचे 7 नगरसेवक, काँग्रेसचे 6, शिवसेनेचे 3, भाजपचा एक नगरसेवक असे पक्षीय बलाबल आहे. राज्यात महाविकास आघाडी सत्तेत असल्याने आघाडीचा फॉर्म्युलाच इथल्या निवडणुकीतही राबवला गेला. मात्र निवडणुकीनंतर सर्वाधिक 7 जागा राष्ट्रवादीकडे असताना 6 सदस्य असलेल्या काँग्रेसला नगराध्यक्ष पदाची आशा लागली आहे. त्यामुळे माहूरमधील महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उद्या निर्णय होणार
माहूर येथील नगराध्यक्षपदासाठी चार जणांचे अर्ज पुढे आले असले तरीही नामनिर्देशन पत्र परत घेण्यासाठी शेवटची तारीख 11 फेब्रुवारी आहे. त्यामुळे आज महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी ठरलेल्या सूत्रानुसार योग्य तोडगा काढणे अपेक्षित आहे. तसेच झाले तरच नगराध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध होऊ शकते.
नायगाव, अर्धापुरात बिनविरोध!
– नायगाव नगरपंचायत अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या गीता जाधव यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे आता त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा 14 फेब्रुवारी रोजी होईल. येथील निवडणुकीत काँग्रेसने सर्वच 17 जागांवर विजय मिळवला होता. अर्ज दाखल करण्यापूर्वी माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत सर्व नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर गीता जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. – अर्धापूर नगरपंचायतीत नगराध्यक्षपदासाठी एकच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. छत्रपती मारोतराव कानोडे यांचा एकच उमेदवारी अर्ज आल्याची माहिती मिळाली. त्यामुळे येथेही नगराध्यक्षपद निवडीची फक्त औपचारिकता बाकी आहे.
इतर बातम्या-