उद्धव ठाकरे-अजित पवारांची संमती, सोमवारी रात्रीच ठरलं, नारायण राणेंना अटक करायचं!
नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांना कानशिलात लगावण्याचं वक्तव्य केल्यानंतर, महाविकास आघाडीच्या नेत्यांची सोमवारी रात्रीच फोनाफोनी झाली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी नारायण राणेंवर कारवाई करण्यावर जोर दिला होता.
मुंबई : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या अटक आणि जामीनानंतर पडद्यामागच्या घडामोडी समोर येत आहेत. नारायण राणेंच्या अटकेसाठी परिवहन मंत्री अनिल परब हे पोलिसांच्या संपर्कात असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. आता त्याआधीचा निर्णय म्हणजे राणेंच्या अटकेच्या कारवाईला हिरवा झेंडा कोणी दाखवला, याबाबतची माहिती समोर आली आहे.
नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांना कानशिलात लगावण्याचं वक्तव्य केल्यानंतर, महाविकास आघाडीच्या नेत्यांची सोमवारी रात्रीच फोनाफोनी झाली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी नारायण राणेंवर कारवाई करण्यावर जोर दिला होता. त्यानंतर सोमवारी रात्री उशिरा नारायण राणेंच्या अटकेबाबत निर्णय झाला. त्यानुसार मंगळवारी 24 ऑगस्टला नारायण राणेंवर अटकेची कारवाई झाली. महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंतिम संमती नंतरच राणेंवर अटकेची कारवाई करण्याचा निर्णय झाला, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.
पोलिसांना कारवाईसाठी मोकळीक देण्याचा निर्णय झाला आणि दुसऱ्याच दिवशी नारायण राणेंना अटक करुन कोर्टात हजर करण्यात आलं.
नारायण राणेंना पुन्हा नोटीस
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ झालीय. नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांना नोटीस बजावली आहे. त्यात राणेंना 2 सप्टेंबरपर्यंत नाशिकला हजर राहण्याचे आदेश दिलेत. नाशिकमध्ये राणेंविरोधातील पहिला गुन्हा दाखल झाला. त्यानंतर नाशिक पोलिसांच्या विनंतीनंतर रत्नागिरी पोलिसांनी नारायण राणे यांना मंगळवारी (24 ऑगस्ट) अटक केली.
नारायण राणेंना रात्री उशिरा जामीन
दरम्यान, नारायण राणे यांना रात्री उशिरा महाड कार्टाकडून अटी शर्तींसह जामीन मिळाला. जामीन मंजूर करताना महाड कोर्टानं काही अटी घातल्या आहेत. राणे यांना 15 हजार रुपयाच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसंच त्यांना भविष्यात असं वक्तव्य करता येणार नाही. ऑडिओ चेक करण्यासाठी राणे यांना एकदा पोलीस ठाण्यात यावं लागणार आहे. त्यासाठी राणे यांना 7 दिवस आधी नोटीस दिली जाईल. त्याचबरोबर 30 ऑगस्ट आणि 13 सप्टेंबरला रायगड गुन्हे शाखेत हजेरी लावावी लागणार आहे. या दरम्यान, कागदपत्रे आणि पुराव्यांसोबत छेडछाड करता येणार नाही, असंही महाड कोर्टानं राणेंना बजावलं आहे.
VIDEO : नारायण राणे यांच्या अटकेचा निर्णय एक दिवस आधीच?
संबंधित बातम्या
Narayan Rane : जामीन मिळताच नारायण राणेंना दुसरा धक्का, नाशिक पोलिसांकडून नोटीस जारी
EXCLUSIVE : नारायण राणेंच्या अटकेची इनसाईड स्टोरी, अनिल परब सतत पोलिसांच्या संपर्कात, अटकेसाठी दबाव?