रमेश लटके असते तर आज शिंदे गटात असते; नारायण राणेंचा मोठा दावा
आमच्या प्रत्येक मंत्र्यांकडे दोन दोन मतदार संघांची जबाबदारी देण्यात आली आहे. आम्ही लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत. माझ्याकडे दक्षिण मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे.
मुंबई: अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी मोठं विधान केलं आहे. दिवंगत आमदार रमेश लटके (ramesh latke) आज जिवंत असते तर ते शिंदे गटात असते, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे. राणे यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राणे यांच्या दाव्यावर अजून उद्धव ठाकरे (uddhav thackeray) गटाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, रमेश लटके असते तर ते खरंच शिंदे गटात असते का? अशी चर्चा आता रंगताना दिसत आहे. दरम्यान, राणे अंधेरीत प्रचार सभा घेणार असल्याची माहिती भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी नारायण राणे यांनी हा दावा केला. निवडणूक आहे. प्रचार सुरू होईल. या निवडणुकीत भाजपच जिंकेल. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आपली बडबड बंद करावी, असं म्हणतानाच ठाकरे गटाचं चिन्ह आईस्क्रीम आहे की मशाल? हे मला काय माहीत? असा सवाल नारायण राणे यांनी केला.
तुम्ही अंधेरीत प्रचार करणार का? असा सवाल राणेंना विचारण्यात आला. त्यावर, आम्हाला आमचे नेते सांगतील तिथे आम्ही प्रचार करू. अंधेरीच काय गुजरातला जायला सांगितलं तरी तिथेही प्रचार करू, असं राणे म्हणाले. तर, राणेंची आम्हाला गरज आहे. त्यामुळे आम्ही अंधेरीत त्यांची सभा घेणार आहोत. तशी विनंती आम्ही राणेंना करणार आहोत, असं आशिष शेलार यांनी सांगितलं.
आमच्या प्रत्येक मंत्र्यांकडे दोन दोन मतदार संघांची जबाबदारी देण्यात आली आहे. आम्ही लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत. माझ्याकडे दक्षिण मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे. दक्षिण मुंबईत भाजपचाच खासदार असेल. मुंबईत एकही खासदार शिवसेनेचा येणार नाही याची आम्ही काळजी घेऊ, असा दावा त्यांनी केला.
आमची दिवाळी मराठी आहे. दांडिया आमचा नव्हता. वरळी कोणाची नाही. वरळी मुंबईत येते. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री भाजप आणि शिंदे गटाचा आहे, असंही त्यांनी सांगितलं.