मुंबई : मराठा समाजातील हजारो तरुणांना उद्योजक बनविण्यात महत्वाची भूमिका बजावलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला राज्य शासनाने तातडीने 100 कोटींचे अर्थसाह्य द्यावे, अशी मागणी या महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यावेळी उपस्थित होते. (Narendra Patil demands Rs 100 crore to Annasaheb Patil Corporation)
पाटील यांनी सांगितले की, मराठा समाजात उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे कर्ज योजना सुरु करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना या महामंडळाला या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सातत्याने मदत केली. त्यामुळे मराठा समाजातील 29 हजार उद्योजकांना या महामंडळामार्फत मदत करण्यात आली. उद्योग सुरु करणाऱ्या तरुणांचे बँकेचे व्याज या महामंडळामार्फत भरले जाते. सरकारी, सहकारी बँका व अन्य वित्त संस्थांच्या माध्यमातून 2 हजार कोटींचे कर्ज वाटप या महामंडळामार्फत करण्यात आले. मात्र महाविकास आघाडीने सत्तेवर आल्यापासून या महामंडळाकडे दुर्लक्ष केले आहे, असा आरोप पाटील यांनी केलाय.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत दिलेल्या कर्जाच्या व्याजापोटी दरमहा 8 कोटींचा परतावा कर्जदारांच्या खात्यात जमा होतो. त्यासाठी राज्य सरकारने महामंडळाला वेळेवर अर्थसाह्य करणे गरजेचे आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारने 2021-22 साठी या महामंडळाला फक्त साडे बारा कोटी रु. देण्याचे जाहीर केले आहे. महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यानंतर या महामंडळाला 50 कोटी रु. देण्याचे जाहीर केले केले होते. मात्र अजूनपर्यंत हे आश्वासन प्रत्यक्षात आलेले नाही, असेही ते म्हणाले. महामंडळाला राज्य सरकारने तातडीने 100 कोटी द्यावेत, अन्यथा या महामंडळामार्फत दिलेली कर्जे एनपीएमध्ये जातील व उद्योग- व्यवसाय सुरु केलेले मराठा तरुण, तरुणी अडचणीत येतील. मराठा समाजातील उद्योजकांना मदतीचा हात देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या महामंडळाला 100 कोटी रु . तातडीने द्यावेत, असेही पाटील यांनी नमूद केले.
महाविकास आघाडी सरकारला मराठा समाजा बद्दल आस्था नाही, हे आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 2021 – 2022 सालाकरिता फक्त साडे बारा कोटी रुपये तरतूद करुन दाखवुन दिलं आहे, असा आरोप माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केलाय. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडे साडे बारा कोटी रुपये एक सप्टेंबरला वर्ग करत असल्याचं एक परिपत्रक मला मिळालं आहे, अशी माहिती पाटील यांनी 2 सप्टेंबर रोजी दिली होती.
राज्यातील 30 हजार युवा उद्योजकांना या योजनेतून 200 कोटी रुपयांचं कर्ज वाटत करण्यात आलेलं आहे. दर महिन्याला 8 कोटी, तर दरवर्षी 96 कोटी रुपये व्याज परतावा केला जातो. या योजनेसाठी राज्य शासनाकडून केवळ साडे बारा कोटींची तरतूद केल्याने उद्योजक अडचणीत येणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात सरकारमध्ये जे लोक बसलेले आहेत ते काय तोंडात पान-गुटखा खाऊन बसेल आहेत का? ते मराठा समाजाबद्दल ब्र सुध्दा काढत नाहीत, अशी खंतही नरेंद्र पाटील यांनी त्यावेळी व्यक्त केली होती.
इतर बातम्या :
उद्धव ठाकरे इलेव्हन दिवाळीपर्यंत तुरुंगात, आव्हाड तुम्हीही बॅग भरा; किरीट सोमय्यांचा थेट इशारा
Narendra Patil demands Rs 100 crore to Annasaheb Patil Corporation