‘मी स्वप्नात आहे का? असं वाटतंय’, राज ठाकरे यांच्या सभेत नरेश म्हस्के भावनिक
"या नरेश म्हस्केवर लहानपणी, वय वर्ष 18 असताना राज ठाकरे यांनी हात ठेवला नसता तर नरेश म्हस्के या खासदारकीचा उमेदवार म्हणून योग्यतेचा नसता हे मी आवर्जून सांगेन", अशी भावना नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ठाण्यातील कळवा येथे सभा पार पडली. शिवसेनेचे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश म्हस्के आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने राज ठाकरे यांची आज सभा आयोजित करण्यात आली. या सभेत राज ठाकरे यांच्या भाषणाआधी नरेश म्हस्के यांनी भाषण केलं. यावेळी भाषण करताना नरेश म्हस्के हे थोडे भावनिक झाले. आपल्या प्रचारासाठी राज ठाकरे हे सभा घेत आहेत हे आपल्यासाठी स्वप्नवत असल्याची भावना नरेश म्हस्के यांनी बोलून दाखवली. राज ठाकरे यांनी तरुणपणात आपल्याला दिलेल्या योग्य संधीमुळेच आपण इथपर्यंत आलो, असंदेखील नरेश म्हस्के यांनी यावेळी बोलून दाखवलं.
“मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत माझ्या खासदारच्या निवडणुकीची प्रचारसभा होत आहे. मी स्वप्नात आहे का? अशा प्रकारची भावना माझ्या मनात येत आहे. ज्या नेत्याचे बोट धरुन या राजकारणात आणलं, ज्या नेत्याने सर्वप्रथम भारतीय विद्यार्थी सेनेचा कॉलेजप्रमुख म्हणून जबाबदारी दिली, त्याच नेत्याच्या उपस्थितीत माझ्या खासदारकीची पहिली प्रचारसभा पार पडत आहे”, अशी भावना नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली.
“महाराष्ट्राचे अराध्यदैवत राजा शिवछत्रपती, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, धर्मवीर आनंद दिघे यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करतो. आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातला फार वेगळा दिवस आहे. आपण राज ठाकरे यांचं भाषण ऐकण्याकरता आलेला आहात. त्यामुळे माझं भाषण ऐकण्यात कुणाला स्वारस्य नाही हे मला माहिती आहे. पण आतापर्यंत राज ठाकरे यांची झालेली सर्व भाषणं प्रत्यक्ष मला ऐकता आली नाहीत. पण मला त्यानंतर विविध चॅनल्स आणि यूट्यूबद्वारे ती भाषणं मी ऐकायचो. कित्येक वर्षानंतर आजचा क्षण आलाय. मला व्यासपीठावर बसून त्यांचं भाषण ऐकता येणार आहे. हा माझ्या आयुष्यातला मोठा दिवस आहे”, असं नरेश म्हस्के म्हणाले.
‘राज ठाकरे यांनी डोक्यावर हात ठेवला नसता तर…’
“राज ठाकरे यांच्याबद्दल अनेक प्रसंग आहेत. मी आज निवडणुकीला उभा आहे. झेंडे लावणारा कार्यकर्ता, जाहीर सभांना झेंडे लावणारा कार्यकर्ता, सभेला माणसं कशी आणता येतील, गर्दी कशी जमवता येईल, आपल्या पक्षाचा उमेदवार लोकांसमोर कसा नेता येईल, आंदोलन कसं करता येईल, याचं नियोजन करणारा कार्यकर्ता आज खासदारकीसाठी उभा आहे. या नरेश म्हस्केवर लहानपणी, वय वर्ष 18 असताना राज ठाकरे यांनी हात ठेवला नसता तर नरेश म्हस्के या खासदारकीचा उमेदवार म्हणून योग्यतेचा नसता हे मी आवर्जून सांगेन”, असं नरेश म्हस्के यांनी सांगितलं.
‘माझ्या आयुष्यात दोन व्यक्तींचं योगदान फार मोठं’
“माझ्या आयुष्यात दोन व्यक्तींचं योगदान फार मोठं आहे. एक धर्मवीर आनंद दिघे, राज ठाकरे. या दोन व्यक्तींनंतर माझ्या खांद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठेवला. त्यांच्यामुळे मला खासदारकीची उमेदवारी मिळाली आहे. आपल्या सगळ्यांच्या सहकाऱ्याने आणि साथीने ही निवडणूक मी लढतोय. आपण कष्ट करताय, लोकांसमोर नरेश म्हस्केला नेण्यासाठी प्रयत्न करत आहात, आणि राज ठाकरे आज माझ्यासाठी भाषण करायला आले आहेत. त्यांचं भाषण मी ऐकणार आहे”, असं नरेश म्हस्के म्हणाले.