मुस्लिम आरक्षणावरुन नसीम खान यांचा सरकारला सवाल
काँग्रेस आमदार नसीम खान यांनी मुस्लिम आरक्षणाबाबत सरकारला विधानसभेत प्रश्न विचारला. मुस्लिम समाजाला आरक्षण कधी मिळणार अशी विचारणा सरकारला केली. त्यानंतर नसीम खान याबाबतची सविस्तर प्रतिक्रिया टीव्ही 9 मराठीला दिली.
मुंबई : काँग्रेस आमदार नसीम खान यांनी मुस्लिम आरक्षणाबाबत सरकारला विधानसभेत प्रश्न विचारला. मुस्लिम समाजाला आरक्षण कधी मिळणार अशी विचारणा सरकारला केली. त्यानंतर नसीम खान याबाबतची सविस्तर प्रतिक्रिया टीव्ही 9 मराठीला दिली.
सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग अर्थात SEBC अंतर्गत येणाऱ्या आणि शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना सुविधा देणारे विधेयक आज सभागृहात मंजुरीसाठी आणले, त्याचे आम्ही स्वागत करून त्यास पाठींबा दिला.मात्र त्याचवेळी मुस्लिम समाजामधील मागास विद्यार्थ्यांना या सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले आहे, असा आरोप नसीम खान यांनी केला.
2014 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने मुस्लिम समाजास शिक्षण क्षेत्रात आरक्षण द्यावे असे आदेश दिले असतानाही युती सरकारने जाणून बुजून मुस्लिम समाजास आरक्षण देण्याचा मुद्दा राखून ठेवला आहे, असा आरोपही नसीम खान यांनी केला.
आज सभागृहात मुस्लिम समाजास आरक्षण देण्यात यावे अशी मागणी केली असता, मंत्री मदन येरावार यांनी राखून ठेवलेला निर्णय मागे घेऊ आणि मुस्लिम समाजातील मागास विद्यार्थ्यांना सवलती लागू केल्या जातील, असे आश्वासन दिल्याचं नसीम खान म्हणाले.
मागील 5 वर्षातील अधिवेशनात धनगर, मुस्लिम, आरक्षणाचे मुद्दे सभागृहात उपस्थित केले. मात्र दरवेळी या सरकारने फक्त आश्वासने दिली, असं नसीम खान यांनी सांगितलं.
या सरकारचे हे शेवटचे अधिवेशन असून आजही त्यांनी फक्त आश्वासन देण्याचे काम नेहमीप्रमाणे केले आहे, असा टोमणा त्यांनी लगावला.
‘सबका साथ सबका विकास’ या ब्रिद वाक्यासोबत आता सबका विश्वास हेही वाक्य जोडले गेले आहे. परंतु हे सरकार जोपर्यत वंचित घटकांचा विश्वास संपादन करत नाही, तोपर्यत या घोषणेची पूर्तता कशी होणार, असा सवाल नसीम खान यांनी विचारला.