आता बलाढ्य खुर्चीही हलायला लागलीय, नाशिकमधून शुभांगी पाटील यांचं भाजपला आव्हान, काय इशारा?
सत्यजित तांबे यांना भाजपचा पाठिंबा मिळणार असल्याची चर्चा सुरुवातीपासून आहे. मात्र अद्याप भाजपने यासंदर्भात खुलासा केलेला नाही.
कुणाल जयकर, नाशिकः नाशिक (Nashik) पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. या जागेच्या दोन प्रबळ दावेदारांमध्ये निवडणुकीची चुरस पहायला मिळतेय. महाविकास आघाडीचा पाठिंबा घेऊन रणसंग्रामात उतरलेल्या शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांनी भाजपला (BJP) आव्हान दिलंय. या निवडणुकीत सामान्य माणसाचाच विजय होईल. आता बलाढ्य खुर्चीही हलायला लागली आहे, असं वक्तव्य त्यांनी केलंय. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना भाजपाचा पाठिंबा मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अद्याप यासंदर्भात अधिकृत घोषणा नाही. त्यामुळे बलाढ्य शक्ती त्यांच्या पाठिशी असली सामान्य जनतेचा विजय होणार असल्याचं वक्तव्य शुभांगी पाटील यांनी केलंय.
काय म्हणाल्या शुभांगी पाटील?
नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत ऐनवेळी काँग्रेसला दगा देत स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज भरणाऱ्या सत्यजित तांबे यांना शुभांगी पाटील यांनी टोला लगावला आहे. त्या म्हणाल्या, ‘ आता बलाढ्य खुर्ची देखील हलायला लागली आहे. आम्ही तरी सामान्य दिसत असू.. परिस्थिती सामान्य असली तरी आम्ही कामाच्या रूपाने बलाढ्य आहोत.. या बलाढ्य शक्तीला सांगा… इथे सामान्य जनतेचाच विजय होणार आहे.
माझे भाऊ, माहेरची साडी..
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी शुभांगी पाटील यांनी भेट घेतली होती. खडसे यांच्याकडून माहेरची साडी मिळाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. आतादेखील त्यांनी हेच ठामपणे सांगितलं, माझे भाऊ, माहेरची साडी माज्या पाठिशी आहे. जनता आता काम करणाऱ्या महिलेलाच निवडून देणार.. माझं बलिदान आणि माझं काम व्यर्थ जाऊ देणार नाही.. मला भरगच्च मतांनी विजयी करणार, असं वक्तव्य शुभांगी पाटील यांनी केलंय.
खऱ्या व्यक्तीला निवडून द्या…
भाजपच्या रणनीतीवर बोट ठेवताना शुभांगी पाटील म्हणाल्या, कोणी काय काय केलं होतं हे तुमच्याच माध्यमातून समोर आलं आहे. आमदार होण्यासाठी हे सगळं योग्य नाही. आता खऱ्या व्यक्तीला निवडून दिलं पाहिजे. अनेक संघटना माझ्या पाठिशी आहेत. त्यामुळे हा विजय दणदणीत असणार आहे..
भाजपचं अजूनही तळ्यात-मळ्यात
सत्यजित तांबे यांना भाजपचा पाठिंबा मिळणार असल्याची चर्चा सुरुवातीपासून आहे. मात्र अद्याप भाजपने यासंदर्भात खुलासा केलेला नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांनीही यावर स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. टीव्ही9 च्या प्रतिनिधींशी बोलताना ते म्हणाले, सत्यजित तांबे यांनी पाठिंबा मागितला नाही, त्यामुळे आम्ही दिलेला नाही. स्थानिक भाजप कार्यकर्ते त्यांच्या मर्जीनुसार मतदान करतील.