Suhas Kande | उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केल्यावर सेना फुटेल हे पवारांना माहिती होतं, सुहास कांदेंचा आणखी एक गंभीर आरोप
जनतेला माहिती आहे. आम्ही निवडणुकीला घाबरत नाहीत. जे उमेदवार उभे करू, त्यांचे धनुष्यबाण चिन्ह असेल. कायद्याने हे चिन्ह मिळवलेले असेल आणि आम्ही निवडणुकीत विजयी होऊन दाखवू, असा इशारा सुहास कांदे यांनी दिला.
नाशिकः उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री केल्यावर शिवसेना फुटेल हे शरद पवारांना माहितं होतं. त्यामुळेच ही रणिनीती आखली गेल्याचा गंभीर आरोप नाशिकचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी केला आहे. एकनाथ शिंदे गटात गेलेल्या सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर एकानंतर एक गंभीर आरोप केले आहेत. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे आज शिवसंवाद यात्रेनिमित्त नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी सुहास कांदे यांनी त्यांना आव्हान दिलं आहे. आदित्य ठाकरे यांचा मनमाडमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला असतानाच मनमाडमध्ये सुहास कांदे यांनीही शिवसैनिकांचा मेळावा घेतला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या रणनितीवर आरोप केले. ठाकरे पिता-पुतांना सत्तेची एवढी लालसा होती, असं वाटलं नव्हतं. बाळासाहेबांना 70 व्या वर्षी जेलमध्ये टाकणाऱ्या भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसायचं… त्याला आम्ही पालकमंत्री आणि साहेब म्हणायचं, हे शिवसैनिकाला कसं सहन होईल? असा सवाल सुहास कांदे यांनी केला. तसेच मतदारसंघातील अनेक प्रकल्पांसाठी आम्ही शेकडो पत्र उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना पाठवली आहेत. मात्र मागील अडीच वर्षात एकाही पत्राला उत्तर दिलेली नाहीत, असा आरोप सुहास कांदे यांनी केला आहे.
पवारांना माहिती होतं…
महाविकास आघाडी सरकारमध्येही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार होते, हे शेवटच्या मिनिटापर्यंत ठरलं होतं. मात्र शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं. कारण ठाकरेंना मुख्यमंत्री केल्यावर शिवसेनेत फूट पडेल, हे पवारांना माहिती होतं. शिवसेनेत फूट पाडण्यासाठी शरद पवार दोषी आहेत, असा गंभीर आरोप सुहास कांदे यांनी केला.
आदित्य ठाकरेंच्या हातात शिवबंधन नाही…
आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत, मात्र त्यांच्या हातात शिवबंधन नाही हेदेखील सुहास कांदे यांनी निदर्शनास आणून दिले. एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेल्या आमदारांमध्ये शिवसैनिकांचं रक्त नाही. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पाठित खंजीर खुपसला असा आरोप केला जातोय, मात्र सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरेना प्रत्युत्तर दिले.
उमेदवार उभे करू, चिन्ह धनुष्यबाण!
एकनाथ शिंदे गटात गेलेल्या नेत्यांना उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून वारंवार निवडणुकीत उतरण्याचं आव्हान दिलं जातंय. जनता तुमच्यावर नाराज आहे. ती कधीही तुम्हाला माफ करणार नाही, असं सांगितलं जातंय. यावर बोलताना सुहास कांदे म्हणाले, जनतेला माहिती आहे. आम्ही निवडणुकीला घाबरत नाहीत. जे उमेदवार उभे करू, त्यांचे धनुष्यबाण चिन्ह असेल. कायद्याने हे चिन्ह मिळवलेले असेल आणि आम्ही निवडणुकीत विजयी होऊन दाखवू…