“सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हटवण्याची हिंमत होतेच कशी?”
Chhagan Bhujbal : सावरकरांची जयंती साजरी करताना सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हटवला; छगन भुजबळ आक्रमक
नाशिक : स्वातंत्र्यवीर सावरकर यांची काल जयंती होती. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात सावरकरांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावरकरांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. यावेळी भाजप-शिवसेनेचे खासदार उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा तात्पुरत्यास्वरूपात हटवण्यात आला. त्यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सावरकरांच्या जयंतीला विरोध नाही. पण पुतळे हटवण्याचं काही कारण नव्हते. राजमुद्रा झाकण्याचे काम केलं गेलं. अहिल्यादेवी होळकर आणि सावित्रीबाई फुले यांचा पुतळा हटवण्याची हिंमत कशी होते?, असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घातले पाहिजे. सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटवणाऱ्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे, असं भुजबळ म्हणालेत.
नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावेळी काय सुरू होतं, हे शरद पवारसाहेबांनी दोन वाक्यात सांगितलं आहे. या धर्मकांडामध्ये मी सहभागी झालो नाही याचा मला अभिमान आहे, असं ते म्हणाले. काल जे काही झालं ते मनाला वेदना देणारं आहे. नवीन संसद झाले पाहिजे यात काही दुमत नाही. मात्र हे लोकशाहीचं मंदिर आहे. सगळ्यांना सोबत घेऊन उद्घाटन केलं असतं तर उचित ठरलं असतं, असंही भुजबळ म्हणालेत.
येत्या काळात निवडणुका लागल्यास महाविकास आघाडीची भूमिका काय असेल. तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार का असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा उद्या निवडणुका घेतली तरी आम्ही तयार आहोत. कर्नाटकमध्ये जे पानिपत झालं आहे. त्यामुळे भाजपला हरवण्यासाठी विरोधकांनी एकत्र येणं आवश्यक आहे, असं ते म्हणालेत.
मंदिरात ड्रेसकोड लागू करण्याचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. त्यावरही भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंदिरात ड्रेस कोड लागू करणं हा मूर्खपणा आहे. असं असेल तर मग मंदिरात बसलेल्या पुजाऱ्याने देखील अंगावर सदरा घालावा. पण ते उघडेच बसतात, असं भुजबळ म्हणाले.
जागा वाटपाच्या चर्चा थांबल्या पाहिजेत. ही जागा चर्चा काय मीडियात करण्यासारखी नाही. महाविकास आघाडीचे नेते बसून यावर निर्णय घेतील, असं म्हणत आगामी निवडणुकीतील जागा वाटपाच्या मुद्द्यावर छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे.