मुंबई : बहुचर्चित नाशिक पदवीधर मतदारसंघाचा (Nashik Padvidhar Election Result)) निकाल अखेर जाहीर झालाय. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांचा प्रचंड मतांनी विजय झालाय. या विजयात वाटा कोणाचा किती आहे? हे सर्व पडद्यामागे आहे. परंतु सत्यजित तांबे यांचे मामा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात या संपुर्ण प्रकरणात मौन होते. त्यांचे हे मौनची खूप काही सांगून जाते. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब असे नेते तुम्ही किती दिवस बाहेर ठेवणार? जास्त दिवस बाहेर ठेऊ नका, आमचा डोळा त्याच्यावर जातो, असे जाहीर कार्यक्रमात म्हणाले होते.
देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर काय झाले. त्या वक्तव्याच्या महिन्याभरानंतर नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागली. विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काँग्रेसने एबी फॉर्म सुधीर तांबे यांना दिला. परंतु त्यांनी पक्षाला टाळून मुलगा सत्यजित तांबे यांचा अपक्ष अर्ज दाखल केला. यासंदर्भात सत्यजित तांबे यांचे मामा ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी बाळगलेले कडकडीत मौन खूप काही सांगून जाते. राजकारणातील अनेक अर्थ त्यातून आता निघत आहे. तांबे पिता-पुत्रांच्या भूमिकेला बाळासाहेबांनी अप्रत्यक्षरीत्या दिलेले समर्थनच होते, अशी चर्चा आहे.
२०१४ मध्ये काय झाले
अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राजीव राजळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवले होते. ते देखील बाळासाहेब थोरात यांचे भाचे होते. काँग्रेस सोडून राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा त्यांचा निर्णयदेखील धाडसी होता. परंतु तेव्हाही “मामा’ या नात्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी मौनच बाळगले होते. “प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे’ एवढेच उत्तर त्यांनी त्या वेळीही दिले होते.
ताबे यांच्या विजयानंतर फडणवीस म्हणाले
नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी एकत्र येत तेथील युवा नेता सत्यजित तांबे यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता. पण सत्यजित तांबे यांनी खूप चांगला लढा दिला. खूप चांगल्या मतांनी ते निवडून आले. त्यामुळे मी त्यांचंही अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.
आता फडणवीस यांची प्रतिक्रिया खूप काही सांगून जाते. एका अर्थाने सत्यजित तांबे काही दिवसांतच भाजपमध्ये दिसल्यास आश्चर्य कोणाला वाटणार नाही. परंतु बाळासाहेब थोरात यांची पत्ते उघडण्यासाठी २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.