Hemant Godse | अनैसर्गिक आघाडीमुळे खासदारांमध्ये अस्वस्थता, शिवसेनेचा घात झाला, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांची प्रतिक्रिया
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतची आघाडी घातक ठरेल, अशी शक्यता वाटतच होती, असं हेमंत गोडसे म्हणाले.
नाशिकः विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने काँग्रेस आणिर राष्ट्रवादी काँग्रेससोबत अनैसर्गिक आघाडी केली. यामुळे खासदारांमध्येही (Shivsena MP) अस्वस्थता होती. ही स्थिती एक दिवस शिवसेनेचा घात करेल, असे वाटत होतं. पण तसंच घडलं. मात्र एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे शिवसेनेला वाचवण्यासाठी पुढे आले असून त्यांना चांगला प्रतिसादही मिळत आहे, अशी प्रतिक्रिया नाशिकचे बंडखोर खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी दिली आहे. काल दुपारपासून राज्यातील शिवसेनेचे १२ खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून ते कधीही फुटण्याची शक्यता आहे, असे म्हटले जात होते. आज अखेर मंगळवारी शिवसेनेच्या १२ खासदारांनी आपला गट असल्याचे जाहीर करून राहुल शेवाळे यांना आपला गटनेता म्हणून निवडले आहे. आज लोकसभा अध्यक्षांनी खासदारांनी भेट घेतली. लोकसभा अध्यक्षांची भेट घेतल्यानंतर खासदार हेमंत गोडसे यांनी टीव्ही 9 च्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
हेमंत गोडसे काय म्हणाले?
लोकसभेत शिवसेनेच्या 12 खासदारांनी वेगळा गट तयार केल्याची माहिती हेमंत गोडसे यांनी दिली. तसेच हे बंड करण्यामागील भूमिकाही त्यांनी सांगितली. ते म्हणाले, ‘ आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढे चाललो आहोत. बाळासाहेबांच्या विचारांना जुळवून घेत आम्ही शिंदे यांच्यासोबत जात आहोत. आमचा गट वगैरे नाही. खासदारांनी एकत्र येऊन निर्णय घेतला आहे. आमचे गटनेते याआधी विनायक राऊत होते. आता राहुल शेवाळे हे आमचे गटनेते असावेत, अशी विनंती आम्ही लोकसभा अध्यक्षांना केली आहे. तसं पत्र त्यांना दिलं आहे. त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आमची भूमिका स्पष्ट होईल.. ‘
‘आघाडी घातक ठरेल वाटलंच होतं…’
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतची आघाडी घातक ठरेल, अशी शक्यता वाटतच होती, असं हेमंत गोडसे म्हणाले. मात्र आता एकनाथ शिंदेंसोबत आम्ही जाणार असल्याने शिवसेना टिकून राहिल, असंही ते म्हणाले. अडीच वर्षांपूर्वी अनैसर्गिक सरकार आलं. त्यावेळी अनेक वेगळे अनुभव आले. त्यामुळे खासदारांमध्ये अस्वस्थता होती. ही आघाडी घातक ठरेल, असं वाटत होतं. त्यामुळे शिंदेंनी पहिलं पाऊल टाकलं आणि त्यांना आता प्रतिसाद मिळू लागला आहे. आम्ही सर्व 12 खासदारांनी गटनेतेपद शेवाळे यांना द्यावं, हीच मागणी केली आहे. लोकसभा अध्यक्षांचा निर्णय झाल्यावर पुढील भूमिका स्पष्ट करू, असेही हेमंत गोडसे यांनी सांगितलं.