नगरसेवकांसह राष्ट्रवादी सोडणार असल्याची चर्चा, आमदार संदीप नाईक यांचा कार्यकर्ता म्हणतो…
गेल्या काही महिन्यांत राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत कमळाला जवळ केलं. राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांनीही पक्षाची साथ सोडली. अशा वेळी महापालिकांमध्येही याचे पडसाद उमटताना दिसू लागले आहेत.

नवी मुंबई : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे राज्यातील प्रत्येक पक्ष विधानसभेच्या तयारीला लागला आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला देशासह महाराष्ट्रातही मोठा पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर या पक्षातील अनेक नेत्यांनी भाजपची वाट धरल्याचं पाहायला मिळालं. गेल्या काही महिन्यांत राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत कमळाला जवळ केलं. राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांनीही पक्षाची साथ सोडली. अशा वेळी महापालिकांमध्येही याचे पडसाद उमटताना दिसू लागले आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच्या सर्व 52 नगरसेवक सध्या पक्षाचा राजीनामा देऊन भाजपात जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासूनची काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता जाऊन तिथेही युती सरकारची सत्ता येण्याची शक्यता आहे. नवी मुंबई महापालिका सध्या राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. पण महापालिकेतील सर्वच्या सर्व नगरसेवक भाजपात गेल्यास भाजपची आणखी एका महापालिकेवर सत्ता येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे एरोली मतदारसंघातील आमदार संदीप नाईक हे भाजपच्या वाटेवर आहेत. इतकंच नाही तर त्यांनी वडील गणेश नाईक यांनाही भाजपमध्ये येण्याचा आग्रह धरल्याची चर्चा आहे. मात्र, संदीप नाईक हे राष्ट्रवादीमध्येच राहणार आहेत, कुणीही पक्ष सोडून जाणार नाही. ही निव्वळ एक अफवा आहे, अशी माहिती संदीप नाईक यांच्या एका जवळच्या कार्यकर्त्याने दिली. सध्या संदीप नाईक यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.
इतकंच नाही तर नवी मुंबईतील शिवसेनेचे 12 नगरसेवक हे संदीप नाईक यांच्या संपर्कात असून ते राष्ट्रवादी पक्षात प्रवेश घेण्यास इच्छूक असल्याचंही कार्यकर्त्याने सांगितलं. आता यामध्ये कोण खरं बोलत आहे आणि कोण खोटं हे तर वेळ आल्यावर कळेलच, मात्र, या सर्व घडामोडींमुळे नवी मुंबईचं राजकारण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
गणेश नाईक नवी मुंबईतील सर्वात मोठा चेहरा
गणेश नाईक हा राष्ट्रवादीचा नवी मुंबई आणि ठाणे या भागातील सर्वात मोठा चेहरा आहे. 17 डिसेंबर 1992 रोजी नवी मुंबई महानगरपालिका स्थापन झाली. तेव्हापासून नवी मुंबई महापालिकेवर गणेश नाईक यांची एकहाती सत्ता आहे, असं म्हटलं तर वावगं ठरु नये. गणेश नाईक हे आधी शिवसेनेत होते. 1990 ला ते पहिल्यांदा नवी मुंबईतून आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 25 मे 1999 रोजी शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करण्यात आली. तेव्हा गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर राज्यातील सत्तेची समीकरणं कितीही बदलली तरी नवी मुंबईत मात्र राष्ट्रवादीचीच सत्ता राहिली.
2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदी लाटेमुळे गणेश नाईक यांना पराभव स्वीकारावा लागला. ते भाजपच्या मंदा म्हात्रे यांच्याकडून पराभूत झाले. राष्ट्रवादीच्या काळात गणेश नाईक यांनी अनेक महत्त्वाची पदं सांभळली. ते ठाण्याचे पालकमंत्री होते. तसेच, ते कामगार, उत्पादन शुल्क आणि पर्यावरण मंत्रीही होते. गणेश नाईक यांचा मुलगा संदीप नाईक हे सध्या नवी मुंबईतील एरोलीचे आमदार आहेत.
संबंधित बातम्या :
नेत्यांच्या पक्षांतरांसाठी भाजपकडून ईडी आणि सीबीआयचा वापर : शरद पवार
जिथे हित असेल तिथे मी जाणार, आमदार शिवेंद्रराजे भोसलेंचं सूचक विधान
चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीला रामराम, सर्व पदांचा राजीनामा
आघाडीची सत्ता पुन्हा येणार नाही, जनतेसाठी भाजपात जातोय : वैभव पिचड