साताऱ्यात उदयनराजेच! शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटलांचा पराभव
सातारा : राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्याचा गड राखला आहे. शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांचा पराभव करत उदयनराजे भोसले यांनी खासदारकीच्या हॅटट्रिकची नोंद केली आहे. 2014 साली मोदीलाटेतही राष्ट्रवादी काँग्रेसने उदयनराजेंच्या रुपाने साताऱ्याची जागा राखली होती. त्याच विजयाची पुनरावृत्ती राष्ट्रवादीने साताऱ्यात केली आहे. राजकीयदृष्ट्या महाराष्ट्राचा विचार केला, तर पहिल्यापासून सातारा जिल्ह्याची ओळख राष्ट्रवादीचा बालेकिल्ला […]
सातारा : राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्याचा गड राखला आहे. शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांचा पराभव करत उदयनराजे भोसले यांनी खासदारकीच्या हॅटट्रिकची नोंद केली आहे. 2014 साली मोदीलाटेतही राष्ट्रवादी काँग्रेसने उदयनराजेंच्या रुपाने साताऱ्याची जागा राखली होती. त्याच विजयाची पुनरावृत्ती राष्ट्रवादीने साताऱ्यात केली आहे.
राजकीयदृष्ट्या महाराष्ट्राचा विचार केला, तर पहिल्यापासून सातारा जिल्ह्याची ओळख राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी राहिली आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच या जिल्ह्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची पकड राहिली. गेल्या 2 टर्म छत्रपती उदयनराजे भोसले हेच राष्ट्रवादीकडून खासदार म्हणून निवडून येत आहेत.
2014 साली काय स्थिती होती?
विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांना 2014 च्या निवडणुकीत 5 लाख 22 हजार 531 मते मिळाली होती. अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव 1लाख 55 हजार 937 मते घेत दुसऱ्या क्रमांकावर होते.
यंदाच्या निवडणुकीची वैशिष्ट्ये, कुणा-कुणाच्या सभा झाल्या?
सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले आणि शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांच्यात ‘काटे की टक्कर’ झाल्याचे पाहायला मिळाले. या दोघांच्या लढतीत मिशी आणि कॉलरचीच चर्चा रंगली. यावेळी सातारा जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारासाठी सातारा लोकसभा मतदार संघात मुख्यमंत्र्यांच्या 2 सभा, उद्धव ठाकरेंची 1 सभा आणि आदित्य ठाकरेंची 1 अशा 4 महत्वाच्या सभा झाल्या.
दुसरीकडे राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी स्वतः प्रचारसभा घेतली. यासोबतच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही भाजप-शिवसेना युतीला विरोध करणारी सभा घेत अप्रत्यक्षपणे उदयनराजेंनाच मदत केली.