Ajit Pawar-Sharad Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी, अजित पवार शरद पवारांच्या निवासस्थानी
Ajit Pawar-Sharad Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार हे शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले आहेत. दोघांमध्ये कौटुंबिक काका-पुतण्याच नातं आहे. पण लोकसभा निवडणूक त्यानंतर विधानसभा निवडणुकीत दोन्ही नेत्यांनी परस्परांवर जोरदार टीका केली होती.
महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्यासह प्रमुख नेते शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले आहेत. आज शरद पवार यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून अजित पवार शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी निवासस्थानी पोहोचले आहेत. अजित पवार यांच्यासह त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल उपस्थित आहेत.
आज शरद पवार यांचा 85 वा वाढदिवस आहे. शरद पवार यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या राजकारणात वैचारिक विरोधाला कधी व्यक्तीगत विरोधामध्ये बदलू दिलं नाही. त्यामुळे शरद पवार यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. सर्वच पक्षात त्यांचे मित्र आहे. आज वाढदिवसाच्या निमित्ताने शरद पवार यांना अनेक जण त्यांना शुभेच्छा देतील. पण अजित पवारांनी शुभेच्छा देण्यासाठी शरद पवारांच निवासस्थान गाठणं ही खास बाब आहे. कारण शरद पवारांच्या उतारवयात अजित पवारांनी त्यांना मोठा राजकीय धक्का दिला. शरद पवारांनी स्वबळावर उभा केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज अजित पवारांकडे आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी स्वबळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 उमेदवार निवडून आणले. शरद पवार यांना फक्त 10 आमदारांवर समाधान मानावं लागलं. शरद पवार यांच्या आतापर्यंतच्या त्यांच्या राजकीय करिअरमध्ये हा त्यांच्यासाठी एक धक्का आहे.
आदरणीय श्री. शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा. pic.twitter.com/6SnkF97upb
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 12, 2024
या भेटीमुळे काय साधलं जाणार?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर टोकाचे राजकीय मतभेद झाले. व्यक्तीगत पातळीवर आरोप-प्रत्यारोप झाले. शरद पवार आणि अजित पवार हे नात्याने काका-पुतण्या आहेत. कौटुंबिक संबंध बिघडले. आज शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अजित पवार यांनी थेट काकांच निवासस्थान गाठून त्यांना शुभेच्छा देणं ही एक चांगली सुरुवात आहे. या निमित्ताने निर्माण झालेली राजकीय कटुता कमी होईल. भविष्यात मनभेद कमी होईल. लोकसभा निवडणुकीपासून ही राजकीय कटुता जास्त वाढली होती. कारण अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात थेट पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली. त्यानंतर विधानसभेला शरद पवारांनी बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या विरोधात त्यांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवाराला उतरवलं. आता वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतल्याने दोन्ही नेते, पक्ष आणि कौटुंबिक मतभेद कमी होतील.