Ajit Pawar : निधी देतो, कचाकचा बटण दाबाच्या वक्तव्यावर अजित पवार यांचं स्पष्टीकरण
Ajit Pawar : इंदापूर येथे सभेत अजित पवारांनी केलेल्या एका वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. ‘तुम्हाला पाहिजे तेवढा निधी आम्ही देऊ, पण आमच्यासाठी मशीनमध्ये कचाकच बटन दाबा’ असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यावर अजित पवार यांनी आज स्पष्टीकरण दिलं. सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी अजित पवारांनी सपत्नीक प्रसिद्ध दगडूशेठ गणपती बाप्पाची आरती केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी पुण्याच्या प्रसिद्ध दगडूशेठ गणपती बाप्पाची आरती केली. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज बारामती लोकसभेसाठी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याआधी त्यांनी दगडूशेठ गणपती बाप्पाच दर्शन घेतलं. दर्शनानंतर अजित पवार यांना गणपती बाप्पांकडे काय मागितलं? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर यश, विजय देवाकडे मागितला असं अजित पवार म्हणाले. “महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणूका चांगल्या वातावरणात पार पडाव्यात, यासाठी गणरायाने आशिर्वाद द्यावेत. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार, त्यासाठी महाराष्ट्रातून महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत, अशी प्रार्थना दगडूशेठ गणपतीच्या चरणी केल्याच” अजित पवार म्हणाले.
“हे सर्व करताना काम, प्रचार करावा लागतो. जनतेचा विश्वास संपादन करावा लागतो. प्रत्येक पक्ष, उमेदवार, कार्यकर्ते जनतेचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करत असतात. शेवटी जनता जर्नादन सर्वश्रेष्ठ आहे. त्यांचा निर्णय सर्वांनाच मान्य करावा लागेल” असं अजित पवार म्हणाले. “आज उमेदवारी अर्ज भरणं म्हणजे शक्ती प्रदर्शन नाही. जास्तीत जास्त महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज भरताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित रहायच हे ठरलय. हा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सांगली, साताऱ्याला जाणार. उद्या धाराशिवला जाणार. शक्ती प्रदर्शन वैगेरे काही नाही. अर्ज भरताना उपस्थित राहण्याच आवाहन केलय. फॉर्म भरल्यानंतर सभा होईल. त्यानंतर नेते आपआपल्या कार्यक्रमाला जातील” असं अजित पवार म्हणाले.
अजित पवारांकडून वक्तव्यावर स्पष्टीकरण
“भाजपाचे महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून देवेंद्रजी बऱ्याच गोष्टी बघतात. मला त्यांच्याशी काही गोष्टी बोलायच्या होत्या. त्यांना माझ्याशी काही गोष्टी बोलायच्या होत्या म्हणून भेट घेतली” असं अजित पवार म्हणाले. इंदापूर येथे सभेत अजित पवारांनी ‘तुम्हाला पाहिजे तेवढा निधी आम्ही देऊ, पण आमच्यासाठी मशीनमध्ये कचाकच बटन दाबा’ असं वक्तव्य केलं. त्यावरुन आता वाद निर्माण झाला आहे. विरोधक अजित पवारांना लक्ष्य करत आहेत. आज अजित पवार यांनी या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं.
‘उगाच कोणी त्यावरुन बाऊ करु नये’
“परवा राहुल गांधी काय म्हणाले?. आता कुठल्या गोष्टीत ‘ध चा मा’ करु नये. मी तिथे गंमतीने म्हटलं. समोर डॉक्टर, वकील होते. ती जाहीर सभा नव्हती, मर्यादीत लोकांची सभा होती. जाहीरनाम्यात बरच काही सांगितलं जातं. मग ते प्रलोभन दाखवतायत का? निधी देत असताना, विकासकामाला रस्ते, विकासाल निधी देण्याच आमदार, खासदाराच काम असतं. आमचा सांगण्याचा प्रयत्न हाच असतो की, मागे ज्याने काम केलं, त्यापेक्षा जास्त विकास आम्ही करु. हे साध सरळ गणित आहे. मी विचार करुनच बोलतो. आचारसंहितेत जे नियम घालून दिले आहेत, त्याचा माझ्याकडून भंग होऊ नये, याची खबरदारी घेत असतो. राहुल गांधींनी म्हटलेलं की, खटाखटा गरीबी हटवू, मी आपल्या ग्रामीण भाषेत कचाकचा म्हटलं, उगाच कोणी त्यावरुन बाऊ करु नये” असं अजित पवार म्हणाले.