Ajit Pawar : अजित पवार बीडमध्ये, स्वागताला धनंजय मुंडे, DPDC ची बैठक वादळी ठरणार का?
Ajit Pawar : पालकमंत्री म्हणून अजित पवार आज बीडमध्ये आले आहेत. अजित पवार यांचा हा बीड दौरा महत्त्वाचा आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे सध्या बीडच राजकारण ढवळून निघालं आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप झालेत. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचा बीड दौरा महत्त्वाचा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बीडमध्ये आले आहेत. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार इथे आले आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहेत. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित असतील. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांची या बैठकीत अत्यंत महत्त्वाची भूमिका असेल. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे सध्या बीडच राजकारण ढवळून निघालं आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघा बंधु-भगिनींकडे कॅबिनेट मंत्री पद आहे. धनंजय मुंडे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आहेत, तर पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन विभागाची जबाबदारी आहे. मुंडे बंधु-भगिनींवर प्रचंड टीका झाल्याने, जिल्ह्यातील अन्य आमदारांचा विरोध असल्याने अजित पवार यांना बीडच पालकमंत्री बनवण्यात आलं.
अजित पवार सध्या बीडच्या राष्ट्रवादी कार्यालयात आहेत. अजित पवार बीडमध्ये आले, त्यावेळी मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांचं स्वागत केलं. पालक मंत्री म्हणून अजित पवार यांचा हा पहिला बीड दौरा आहे. गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित राष्ट्रवादी कार्यालयात हजर आहेत. तुम्ही बाहेर का बसलात? असं प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर ते म्हणाले की, “असं काही नाहीय तालुकानिहाय दादा चर्चा करत आहेत. आढावा घेण्यासाठी इथे आले आहेत. डीपीडीसी बैठक आहे”
निधी वाटपाच्या दृष्टीने जिल्हा नियोजन समितीची बैठक महत्त्वाची
पालकमंत्री म्हणून अजित पवारांकडून गेवराई मतदारसंघासाठी काय अपेक्षा असतील? त्यावर विजयसिंह पंडित म्हणाले की, “राज्याच्या विधिमंडळात गेल्यानंतर आमच्याकडून लोकांच्या मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहेत. बीडचे पालकमंत्री म्हणून दादांनी जबाबदारी घेतल्याने त्या अपेक्षा पूर्ण होतील. सिंचन क्षेत्र वाढीचे, काही प्रकल्प आहेत. दळणवळण गावांना जोडणारे काही रस्ते आहेत. प्राथमिक शाळांमध्ये भैतिक सुविधा उपलब्ध करुन देण्याचा विषय आहे” जिल्ह्यात विविध विकास प्रकल्पांसाठी निधी वाटपाच्या दृष्टीने ही जिल्हा नियोजन समितीची बैठक महत्त्वाची आहे.