Ajit Pawar | ‘उतारवयात फार कंटाळा आला, तर….’ अजित पवारांचा शरद पवारांना जिव्हारी लागणारा टोमणा
Ajit Pawar | अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली. त्यांनी शरद पवार यांना जिव्हारी लागणारे टोमणे मारले. अजित पवार काल बारामतीच्या दौऱ्यावर होते. बारामतीमध्ये त्यांना संभाचा धडाका लावला होता. मतदारांशी थेट संपर्क साधला. बारामतीच्या पीचवर पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा सामना होणार आहे.
बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघ कुठल्या पक्षाकडे जाणार? हे महायुतीमध्ये अद्याप ठरलेलं नाहीय तसच अधिकृत उमेदवाराच्या नावाची घोषणा सुद्धा झालेली नाहीय. पण बारामतीमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित आहे. शरद पवार गटाकडून त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे निवडणूक रिंगणात असणार आहेत. यंदा प्रथमच पवार विरुद्ध पवार असा बारामतीमध्ये सामना रंगणार आहे. त्यासाठी दोन्ही बाजूंकडून जोरदार मोर्चेंबांधणी सुरु आहे. दोन्ही संभाव्य उमेदवार बारामती लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत आहेत. मतदारसंघातील आजी-माजी आमदार, प्रतिष्ठीत नागरीक यांच्या भेटीगाठी सुरु आहेत. दोन्ही पवारांसाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे. म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल अख्खा दिवस बारामतीमध्ये घालवला. बारामतीमध्ये त्यांनी सभांचा धडाका लावला. मतदारांशी संपर्क साधला.
अजित पवार यांनी काल बारामतीमध्ये एका सभेला संबोधित करताना आपले काका शरद पवार यांना जिव्हारी लागणार टोमणा मारला. “उतारवयातील लोकांनी आशिर्वाद देण्याच काम करायच असतं. काही चुकलं तर कान धरायचा असतो. फारच कंटाळा आला तर भजन करायच असतं. सध्या खूप जणांना फोन येत आहेत. खूप जणांना बोलावल जातय. भावनिक केलं जात आहे. भावनिक व्हाय़च की विकास कामांच्या मागे उभं रहायच हे तुम्ही ठरवायचय” असं अजित पवार मतदारांना म्हणाले.
याआधी अजित पवारांनी कधी इतका जोर लावला नव्हता
“आपल भलं करुन घ्यायच. तालुक्याचा सर्वांगिण विकास करायचा की, तालुक्यातील विकासकामांना खीळ निर्माण करायची हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे” असं अजित पवार सभेला संबोधित करताना म्हणाले. याआधी बारामतीमध्ये अजित पवार यांनी कधी इतका जोर लावला नव्हता. मतदानाच्या एक-दोन दिवस आधी येऊन ते मतदारसंघाचा आढावा घ्यायचे. पदाधिकारी-कार्यकर्ते यांना सूचना करायचे. पण यावेळी अजित पवार स्वत: मतदारसंघामध्ये फिरतायत. पुढच्या राजकीय वाटचालीसाठी सुनेत्रा पवार यांचा बारामतीमध्ये विजय अजित पवार यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण बारामती हा दोन्ही पवारांचा बालेकिल्ला आहे.