मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शिबीर आज मुंबईत आयोजित करण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी या शिबिरमध्ये भाषण करताना आमदार एकनाथ खडसे यांच्या जावईबद्दल मोठा दावा केला आहे. खरंतर यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. केंद्र सरकारकडून केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन विरोधकांना नाउमेद करण्याचं काम केलं जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला. यावेळी त्यांनी तपास यंत्रणांकडून राष्ट्रवादीच्या ज्या नेत्यांना अटक करण्यात आलीय त्यांचा उल्लेख करत सरकारवर निशाणा साधला. यामध्ये त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख, नवाब मलिक आणि एकनाथ खडसे यांच्या जावायाचा उल्लेख केला.
“माझी आजच जळगावला काही सहकाऱ्यांशी चर्चा झाली. एकनाथ खडसे हे आपले सहकारी आहेत. ते आधी भाजपात होते. त्यांनी भाजप सोडलं आणि त्यांच्यावर खटला दाखल झाला. त्यांच्या जावयाला अटक झाली. आज सव्वा दोन वर्ष झाली, त्यांच्या जावायाची केस कोर्टात नेत नाहीत आणि जेलमध्ये डांबून ठेवलं आहे”, असं शरद पवार म्हणाले.
“माहिती अशी आली की, त्यांच्यासोबत अन्य सहकारी जे तुरुंगात होते त्यांनी स्पष्ट कळवलं की, जर यांच्यामागची खोटी केस मागे घेतली नाही तर किंवा निकाल लवकर लागला नाही तर खडसेंचा जावई आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही. आज अशी अवस्था एका तरुणाची केली, ही तक्रार त्यांच्या कुटुंबाकडून ऐकायला मिळते”, असं शरद पवार यांनी आपल्या भाषणात सांगितलं.
“सत्तेचा गैरवापर केला जातोय. जेव्हा मी ग्रामीण भागात जातो, ते सांगतात की, दोन वेळा भांडण झालं तर लोक बोलतात तू शांत बस नाहीतर मी ईडी लावतो. आता ईडी हा शब्द आज घराघरात माहित झाला. सीबीआयची चौकशी घराघरात माहित झाली. पदाचा वापर करुन विरोधी पक्ष नाउमेद कसा केला जाईल, याची खबरदारी घेतली गेल्याचं बघायला मिळालं”, अशी टीका शरद पवार यांनी केली.
“आपले सहकारी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खटला दाखल करण्यात आला. अनिल देशमुखांनी 100 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला. त्यांना अटक केली गेली. त्यांना तब्बल 13 महिने जेलमध्ये ठेवलं. आता आरोपपत्र दिलं त्यामध्ये सव्वा कोटीचा भ्रष्टाचार झाला असा उल्लेख करण्यात आला. तेही गुजरातच्या शिक्षण संस्थेला कुणी देणगी दिली ती देणगी स्वीकारली हा गुन्हा दाखल केला”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.
“आज मी स्वत: अनेक शिक्षण संस्थांचा अध्यक्ष आहे. या शैक्षणिक कामात लोक देणगी देत असतात. संस्था चालवण्यासाठी वेगवेगळी देणगी स्वीकारावी लागते. मुलांच्या शिष्यवृत्तीसाठी देणगी घ्यावी लागते. अनिल देशमुख यांनी शिक्षण संस्थेसाठी एक कोटी रुपये देणगी घेतली त्यासाठी त्यांना अटक केली. 13 महिने तुरुंगात ठेवलं. याचा अर्थ काय?”, असा सवाल शरद पवार यांनी केला.
“याचा अर्थ असाच की, लोकशाहीत आज कुणी भूमिका घेऊन पुढे येत असेल, तो आमच्या विचाराचा नाही त्याला आम्ही याच पद्धतीने डांबून ठेवू, त्याच्यावर खोट्या केसेस भरु. हाच प्रकार अनिल देशमुख यांच्याबद्दल झाला”, असं पवार म्हणाले.
“आपले सहकारी नवाब मलिक कितीदिवस जेलमध्ये? जर 15 दिवसात बेल मिळेल असं वाटतं तर तारीख बदलली. दीड वर्ष एका लोकप्रतिनिधीला जो चार-चार वेळेला निवडून आला, सामान्य लोकांमध्ये जातो, केवळ राजकीय पक्षाचा प्रवक्ता आहे आणि यांच्या खोट्या गोष्टी समाजासमोर प्रभावीपणाने मांडतो. त्यामुळे नवाब मलिक यांना जेलमध्ये ठेवलं आहे. सत्तेचा गैरवापर यापेक्षा काय असू शकतो?”, असा सवाल त्यांनी केला.
“ही सगळी उदाहरणं एकच सांगतात की, आम्ही सत्तेचा गैरवापर करणार. आमच्या विरोधातील मत मान्य नसेल तर त्याच्यावर कारवाई करणार. हे राज्य आणि हा देश आम्ही म्हणणार तशाच पद्धतीने चाललं पाहिजे ही भूमिका घेऊन आज देशाचं राजकारण एका वेगळ्या दिशेला नेत आहेत’, असं शरद पवार यावेळी म्हणाले.