निलेश लंकेंचं पत्र्याचं घर, 1 खोली, बाजूला बाथरुम, लाकडी कपाटाला प्लॅस्टिक खुर्ची टेकवून शरद पवारांची बैठक!
लोकप्रतिनिधीचे घर म्हंटलं तर मोठा बंगला, बंगल्यासमोर नोकरचाकर, अलिशान गाड्या असं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. पण निलेश लंके यांचं घर पाहून हे आमदाराचं घर आहे यावर विश्वास बसणार नाही.
अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे आज नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचं उद्घाटन झालं. या सोहळ्यानंतर शरद पवार आमदार निलेश लंके यांच्या घरी गेले. निलेश लंके हे नगर जिल्ह्याच्या पारनेर मतदारसंघाचे आमदार आहेत. कोव्हिड काळात राज्यात सर्वात मोठं कोव्हिड सेंटर उभा करणारे आमदार म्हणून निलेश लंके हे नाव राज्यभर गाजलं होतं. आमदार लंके स्वत: कोव्हिड सेंटरमध्ये राहत होते.
दरम्यान, आमदार निलेश लंके यांच्या घरी शरद पवारांनी भेट दिली. लोकप्रतिनिधीचे घर म्हटलं तर मोठा बंगला, बंगल्यासमोर नोकरचाकर, अलिशान गाड्या असं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. पण आमदार निलेश लंके यांचं घर अत्यंत साधं आहे. एक रुम, त्यातच छोटं किचन आणि बाजूला बाथरुम अशी निलेश लंके यांच्या घराची रचना. आमदार लंके यांच्या या छोट्या घरात देशातील बडा नेता असलेले शरद पवार यांनी भेट दिल्यामुळे लंके कुटुंबीय भारावून गेलं.
लाकडी कपाटाला खुर्ची टेकवून बैठक
शरद पवार हे लंकेच्या घरी दाखल झाले. त्यांना बसण्यासाठी प्लॅस्टिकची खुर्ची ठेवण्यात आली होती. लाकडी कपाटाला टेकून ही खुर्ची ठेवली. मागच्या भिंतीला गुलाबी रंग होता. गुळगुळीत आणि चकचकीत बंगल्याच्या भिंती जशा असतात तसं चित्र अजिबात नव्हतं. पवारांच्या बाजूला दोन खुर्च्या ठेवल्या होत्या. तिथे निलेश लंके यांचे आई-वडील बसले होते.
धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, रोहित पवारही घरी
आमदार लंके यांच्या छोटेखानी घरात राष्ट्रवादीचे बडे नेते उपस्थित होते. यावेळी शरद पवारांसोबत नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि आमदार रोहित पवार हे सुद्धा निलेश लंके यांच्या घरी दाखल झाले. राज्यातील भारदस्त नेते छोट्या घरात आल्यानंतर, लंके कुटुंबाची एकच धावपळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं.
पवारांच्या बाजूला खाटवजा पलंगावर धनंजय मुंडे बसले, दुसऱ्या खुर्चीवर हसन मुश्रीफांनी बैठक मारली तर रोहित पवार आजूबाजूला जागा शोधत होते.
निलेश लंके यांचं घर कसं आहे?
लोकप्रतिनिधीचे घर म्हंटलं तर मोठा बंगला, बंगल्यासमोर नोकरचाकर, अलिशान गाड्या असं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. पण निलेश लंके यांचं घर पाहून हे आमदाराचं घर आहे यावर विश्वास बसणार नाही.
अकराशे बेडचं कोविड सेंटर उभारणारे पारनेरचे आमदार निलेश लंके यांचं घर म्हणजे मोठा बंगला असेल असा अंदाज काहींनी लावला असेल. पण प्रत्यक्ष लंकेंचं घर हे सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणेच आहे.
छोट्या घरात 9 जणांचं कुटुंब
सामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या निलेश लंके हे आज आमदार असले तरी आजही त्याचं कुटूंब एक छोट्याशा घरात राहतं.. एक छोटंस किचन आणि एक रूम, त्यातच बाथरूम असं लंके यांचं घर आहे. अनेकांना याचं नवल वाटतं. विशेष म्हणजे लंके यांचं एकत्रित कुटुंब आहे. त्यांच्या परिवारात आईवडील, भाऊ- भावजय, पुतण्या-पुतणी, दोन मुले, आणि पत्नी असं 9 जण राहतात. तर लहानपणापासून लंके यांना समाजसेवेची आवड होती. तर लंके यांचे वडील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतून सेवानिवृत्त आहेत.
आमचा मुलगा हा आमदार होईल हे कधी स्वप्नातही वाटले नव्हते. पहिल्यापासून त्याने कधी घराकडे लक्ष दिले नाही. कोणी आजारी पडले, कुठे काही समस्या निर्माण झाली तर धावून जाणे एवढंच त्याचं काम होतं. आमच्याकडे काहीच नव्हतं पण आज मुलगा आमदार झाल्याचं पाहून अभिमान वाटतो, अशा भावना, आमदार लंके यांची आई शकुंतला यांनी व्यक्त केली.
निलेश लंके – साध्या कंपनीतील कर्मचारी
लंके यांनी पारनेर तालुक्यातील भाळवणी इथे 1 हजार 100 बेडचं कोविड सेंटर उभारलं होतं. त्यांनी या कोविड सेंटरमध्ये रुग्णांची अहो रात्र सेवा केली. लंके यांचं लग्न झालं तेव्हा ते कंपनीत कामगार होते. तेव्हा कधीच वाटले नव्हते माझे पती आमदार होतील अशा भावना लंके यांच्या पत्नीने व्यक्त केल्या.
लंके यांच्या पत्नी राणी लंके या त्यांच्या मामाचीच मुलगी आहेत. त्यादेखी सध्या जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत. आमदाराची पत्नी असली तरी त्या इतर सामान्य कुटुंबातील महिलांप्रमाणेच घरकाम, कुटुंबाचा सांभाळ करतात. घरी आलेल्या पाहुण्यांसाठी चहा,नाष्टा, जेवण त्या बनवतात. इतकंच नाहीतर कपडे धुणे, भांडी घासणे इत्यादी कामे त्या स्वतः करतात. जोडीला त्यांच्या जाऊबाई असतात. त्या त्यांची मोठी बहीणच आहे.
आज अनेक लोक घरी येतात , काही तर दुसऱ्याच्याच बंगल्यात शिरतात. अनेक जण घरा समोरून जातात, पण कोणाला विश्वास बसत नाही की हे आमदारांचं घर आहे. लग्न झाले तेव्हा आमचं साधारण कुटुंब होतं. तेव्हा कधी वाटलं नाही का हे आमदार होतील, असं पत्नी राणी लंके म्हणतात.
आमचं घर पावसाळ्यात गळतं त्यावेळी हाल होतात, मी अनेकदा काकांना म्हणते आता तुम्ही आमदार झालात, आपल्याला घर कधी बांधायचं, अशी प्रतिक्रिया लंके यांची पुतणी अक्षदा हिने दिली.
संबंधित बातम्या
पवारांसमोर गडकरी म्हणाले, साहेब त्याची आम्हाला लाज वाटते, त्यांना वाटते की नाही माहिती नाही!