Dhananjay Munde : धनंजय मुंडे स्वत:च्या राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, ‘मी काहीही…’
Dhananjay Munde : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा रंगली आहे. काल सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्याशिवाय मुंडे स्वत: पक्षाध्यक्ष अजित पवार यांना भेटले. आज स्वत: धनंजय मुंडे या विषयावर बोलले आहेत.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत चालला आहे. या प्रकरणतील मुख्य आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. खंडणी प्रकरणात अटकेत असलेला वाल्मिक कराड हाच या हत्येमागचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप होतोय. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय मानला जातो. दोघांचे अनेक फोटो व्हायरल झाले होते. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी विरोधी पक्षांची आणि बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची मागणी आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी काल सर्वपक्षीय शिष्ट मंडळाने राज्यपालांची भेट घेतली होती.
आज धनंजय मुंडे मंत्रालयात मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी आले. त्यावेळी पत्रकार आणि चॅनल्सचे बूमचा एकच गराडा त्यांच्याभोवती होता. त्यावेळी धनजंय मुंडे जास्त काही बोलले नाहीत. फक्त ते इतकच म्हणाले की, ‘मी, काहीही राजीनामा वैगेरे दिलेला नाही’ असं ते म्हणाले. आरोप करणाऱ्यांना आरोप करु द्या असं धनंजय मुंडे सुरेश धस यांच्या आरोपांवर बोलले. कालच्या दिवसात दोन मोठ्या घडामोडी घडल्या. मंत्री धनंजय मुंडे यांनी काल पक्षाध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर अजित पवार यांनी सागर बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटींमुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार का? ही चर्चा रंगली आहे.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
“सरकारने संवेदनशीलपणे विचार करावा. अशोक चव्हाणांवर जेव्हा आरोप झाले, तेव्हा काँग्रेस पक्षाने, त्यांनी नैतिकतेच्या दृष्टीने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. रोज 28 दिवस या बातम्या येत आहेत. सरकारने थोडासा संवेदनशीलपणा दाखवावा. मुख्यमंत्र्यांच स्टेटमेंट आलय, कोणालाही सोडणार नाही. अंजली दमानिया, सुरेश धस जे बोलत आहेत, ते अस्वस्थ करणारं आहे. या विषयात राजकारण बाजूला ठेऊन माणुसकीच्या दृष्टीने विचार करावा” असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. “हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहेत, त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. आज महाराष्ट्रच नाही, देशातील मीडिया ही स्ट्रोरी ट्रॅक करतय” असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
SIT मध्ये मुंडेने आणलेले अधिकारी – संभाजी राजे
“SIT नेमली त्यात, मुंडेने आणलेले अधिकारी. ते काय न्याय देणार. एका पीएसआयचा वाल्मिक कराड सोबतचा जल्लोष करतानाचा फोटो आहे. एसआयटी नेमता, सीआयडी नेमता तुम्हाला काय पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी यावर बोललं पाहिजे. तुम्ही थेट आयपीएस अधिकारी नेमा, त्यांची एसआयटी बनवा, न्याय मिळेल” अशी मागणी संभाजी राजे यांनी केली.