पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल गेल्या आठवड्यात अनेक चर्चा रंगल्या. अजित पवार अचानक नॉट रिचेबल झाले होते. त्यांचे त्या दिवसाचे अनेक कार्यक्रम रद्द झाले होते. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं. त्यानंतर या चर्चा सलग तीन ते चार दिवसात प्रचंड वाढल्या. अजित पवार राष्ट्रवादीच्या 40 आमदारांसह बंड पुकारणार, ते भाजपसोबत जाणार आणि राज्याचे मुख्यमंत्री होणार, इथपर्यंतच्या चर्चा रंगल्या होत्या. पण अजित पवार अखेर माध्यमांसमोर आले आणि त्यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. पण आज अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं विधान केलं आहे.
अजित पवार यांनी याआधी उपमुख्यमंत्री पद भूषवलं आहे. याशिवाय अजित पवार भाजपसोबत गेले तर मुख्यमंत्री होतील, अशा चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर आता अजित पवार यांनी आज केलेल्या विधानावरुन त्यांचं आगामी काळात मुख्यमंत्री पदाशिवाय समाधान होणार नाही, असंच दिसतंय. त्यांनी ‘सकाळ’च्या कार्यक्रमात दिलेल्या विशेष कार्यक्रमात याबाबत भूमिका मांडली आहे. “राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदाचं आकर्षण नाही. पण मख्यमंत्रीपदाची दावा ठेवण्याची आताही तयारी आहे”, असं मोठं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे.
यावेळी अजित पवार यांना पहाटेच्या शपथविधीवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भूमिका मांडणार नसल्याचं स्पष्ट केलं. “पहाटेचा शपथविधी नाही. सकाळी आठला पहाट म्हणत नाही. पहाट म्हणजे चार पाच, सहा वाजेची वेळ. या गोष्टीला जवळपास साडेतीन वर्ष झाली आहे. मी वारंवार बोलतोय की, या विषयावर मला भाष्य करायचं नाही”, असं अजित पवार म्हणाले.
“मला उपमुख्यमंत्री पद का मिळालं? तर मला राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आमदार निवडून आले होते त्यापैकी बहुसंख्य आमदारांनी अजित पवार यांनाच उपमुख्यमंत्री पद द्यावं, असं पक्षाला सांगितलं. त्यानंतर पक्षाच्या वरिष्ठांनी मला ते पद दिलं”, असं अजित पवार यांनी सांगितलं.
भाजपसोबत गेलो तर आपण स्थिर सरकार स्थापन करु शकतो, असं म्हणणारा राष्ट्रवादीत दबाव गट आहे का? असा प्रश्न अजित पवार यांना यावेळी विचारण्यात आला. त्यावर त्यांनी तसा कोणाताही दबाव गट पक्षात नाही, असं स्पष्ट केलं. “गैरसमज करायला कारण नाही. आपण याआधी सेक्युलर, सर्वधर्म समभाव, पुरोगामी महाराष्ट्र अशा सगळ्या गोष्टी बोलत आलो. पण नंतरच्या काळात 2019 ला तुम्ही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार बनवण्यात आलं त्यावेळी या सगळ्या गोष्टींना फाटा देण्यात आलं”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
“शिवसेनेने नेहमी हिंदुत्वाचा पुरस्कार केला आहे. आजही हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असं म्हटलं जातं. त्यांनी त्याच भूमिकेतून शेवटपर्यंत काम केलं. त्याच रस्त्याने उद्धव ठाकरे पुढे गेले. पण महाराष्ट्राच्या विकासासाठी महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांनी ज्या भूमिकांमुळे वाद होतील, ते मुद्दे पुढे करायचं नाही, असं ठरलं होतं”, असं अजित पवार यांनी सांगितलं.
“शेवटच्या कॅबिनेटमध्ये उद्धव ठाकरे यांनी आम्हाला सांगितलं की, आम्हाला कोणत्याही परिस्थितीत औरंगाबाद शहराला संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराला धाराशिव नाव द्यायचं आहे. वास्तविकपणे त्याबाबत काँग्रेसची वेगळी भूमिका होती. पण विरोध झाला नाही आणि कॅबिनेटला एकमताने ठराव झाला. त्याबाबत अंमलबजावणी करण्याआतच पुढची कॅबिनेट झालीच नाही. सरकार कोसळलं. त्यानंतर एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वातील सरकारल आलं. त्यांनी तशा विचाराचे सरकार असल्याने त्याबाबत काम केलं”, असं अजित पवार म्हणाले.