Ajit Pawar : छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या मुद्यावर अजित पवार एकदम स्पष्ट शब्दात बोलले, VIDEO
Ajit Pawar : कांदा उत्पादक शेतकऱ्याचे प्रश्न, छगन भुजबळ यांच्या नाराजीची चर्चा, सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते? या सगळ्या प्रश्नांना आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं.
“कांद्यामुळे आम्हाला फटका बसला. त्या संदर्भात पीयुष गोयल, अमित शाह या वरिष्ठांशी चर्चा केली. कांदा उत्पादक शेतकरी नाराज होता. त्याची किंमत आम्हाला मोजावी लागली. कांदा उत्पादकाला आणि ग्राहकाला दोघांना परवडलं पाहिजे, असं आमच मत होतं. आता ती मागणी गांभीर्याने घेतली आहे. उत्तर महाराष्ट्रात जळगाव आणि रावेरची जागा सोडली, तर अन्यत्र महायुतीला फटका बसला. नगर, नाशिक, सोलापूर आणि पुणे या पाच सहा जिल्ह्यात कांद्याच पीक घेतलं जात” असं अजित पवार म्हणाले. “निवडणुका झाल्यानंतर अनेक राजकीय पक्षाचे नेते आपली मत मांडत असतात. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत आणि भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. त्या प्रत्येक टिका टिप्पणीला उत्तर देणार नाही” असं अजित पवार म्हणाले.
“मला तुम्ही विकासाबद्दल विचारा. मी विकासामध्ये लक्ष घातलय. आपलं राज्य, जिल्ह्यातील महत्त्वाची काम कशी मार्गी लागतील हा प्रयत्न आहे. नव्या उमेदीने विधानसभेला महायुती पुन्हा सामोरी जाईल” असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. ‘पराभवावर मला चिंतनाची गरज नाही’ असही अजित पवार म्हणाले. राज्यसभेची उमेदवारी सुनेत्रा पवार यांना जाहीर झाल्याने छगन भुजबळ नाराज आहेत का? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, “तुम्हाला काही महित नसतं. बातम्या पेरण्याचा काम तुम्ही करता. तो तुमचा अधिकार आहे. स्वत: छगन भुजबळ म्हणाले मी नाराज नाही. तरीही काही विरोधक, जवळचे मित्र अशा बातम्या पिकवत आहेत, त्यात तूसभरही तथ्य नाही. पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय झालाय” सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते का नव्हते?
काल सुनेत्रा पवार यांचा फॉर्म भरताना महायुतीचे नेते तिथे नव्हते, या प्रश्नावर सुद्धा अजित पवार यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या. “काल आम्ही फॉर्म भरला, पण त्याआधी एक दु:खद घटना घडलेली. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय अमोल काळे यांचं निधन झालं. अस्थी विसर्जनासाठी त्यांना नाशिकला जायच होतं. ते दोन दिवस दु:खात आहेत. एकनाथ शिंदे यांना रात्री वर्षावर जाऊन भेटलो. उमेदवाराच नाव आज किंवा उद्या ठरेल असं सांगितलं. सगळ्यांनी फॉर्म भरायला याव असं मला वाटलं नाही. एकनाथ शिंदे म्हणाले फॉर्म भरुन या. महायुती सोबत आहे. मीच त्यांना बोलावल नव्हतं. तरीही बातम्या चालवल्या महायुतीचे नेते दिसत नाहीयत म्हणून. व्यक्ती दु:खात असताना फॉर्म भरायला चला असं म्हणण योग्य वाटत नाही” असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.