Chhagan Bhujbal : धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर छगन भुजबळ यांचं रोखठोक मत, ‘मला मंत्री व्हायचं….’
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकाच कारमधून प्रवास केला होता. त्यानंतर शरद पवार यांनाही भेटले. ते भाजपत जाणार अशी चर्चा आहे. त्यावर आज पत्रकारांनी विचारल्यानंतर छगन भुजबळ यांनी उत्तरं दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आज मीडियाशी संवाद साधला. सध्या ते पक्षात नाराज आहेत. अलीकडेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकाच कारमधून प्रवास केला होता. त्यानंतर शरद पवार यांनाही भेटले. यावर आज छगन भुजबळ बोलले. पत्रकारांनी त्यांना विचारलं, देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांच्या बरोबर भेट झाली, काय चर्चा झाली? त्यावर ते म्हणाले की, “हे खरं आहे, मी मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटलो होतो. 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस होता. त्या निमित्ताने जन्मगावी नायगाव येथे मोठा कार्यक्रम असतो, मुख्यमंत्री आणि सात-आठ मंत्री तिथे होते. काही विकास काम करायची आहेत. त्याबद्दल त्यांनी ताबडतोब कलेक्टर आणि सगळ्यांना जमीन अधिग्रहणाचे आदेश दिले”
“त्याचदिवशी संध्याकाळी चाकणला महात्मा फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होतं. तिथे शरद पवार साहेब होते. मला बोलावलं होतं. नायगावला काय आणि चाकणला काय, शरद पवार यांच्यासोबत काय आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत काय… राजकारणावर चर्चा झाली नाही. आमची फक्त महात्मा फुले, सावित्रीबाई फुले या विषयावर चर्चा झाली” असं छगन भुजबळ म्हणाले.
‘मला मंत्री व्हायचं आहे, म्हणून….’
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे, त्यांचा राजीनामा घेऊन तुमचा मंत्रिमंडळात समावेश होणार अशी चर्चा आहे. त्यावर छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं. “मला मंत्री व्हायचं आहे, म्हणून कोणाचा तरी बळी घ्यावा, राजीनामा घ्यावा आणि मला मंत्री करावं असं माझ्या स्वप्नातही येणार नाही” असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं.
‘साप साप म्हणून भूई थोपटणं हे योग्य नाही’
“मुंडेंचा राजीनामा मागितला जात आहे. मला सांगायचं आहे की फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं मी पूर्ण चौकशी करणार. चौकशीत कोण सापडले, आका काय काका काय त्या सर्वांवर कारवाई करू. त्या आधी मुंडेंचा राजीनामा का मागत आहात? चौकशीतून काही आलं का? तुमच्याकडे काही असेल तर पोलिसांकडे द्या. जोपर्यंत चौकशीतून काही येत नाही. तोपर्यंत राजीनामा मागणं चुकीचं आहे. मला हे बरोबर वाटत नाही. साप साप म्हणून भूई थोपटणं हे योग्य नाही” असं छगन भुजबळ म्हणाले.
‘माझं पद गेलं, डाग लागला’
“मी ही अशा प्रकरणातून गेलो आहे. 2003 मध्ये तेलगीला पकडलं मी, त्याच्यावर मोक्का दाखल केला मी. माझ्यावर आरोप लागल्यावर माझा राजीनामा घेण्यात आला. तेव्हा मी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होतो. राज्य आमचं होतं. पण परिस्थिती पाहून मीच सुप्रीम कोर्टात गेलो. सुप्रीम कोर्टाच्या माध्यामातून ही केस सीबीआयला गेली. तेव्हा केंद्रात भाजपचं सरकार होतं. सीबीआयने चौकशी केली. त्यांनी सांगितलं. तुमचा काहीही दोष नाही. माझं नाव चार्जशीटमध्ये नव्हतं. माझं पद गेलं, डाग लागला. मनस्ताप झाला. पण त्यानंतर पवार साहेबांनी मला मंत्री केलं. मी ते भोगलं आहे. कारण नसताना, सिद्ध झालेलं नसताना राजीनामा घेणं योग्य नाही” असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.