Mahayuti | ‘श्रीकांत यांनी थोडी शिस्त पाळली पाहिजे’, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना सुनावलं
Mahayuti | "शरद पवार कृषिमंत्री असताना कांद्याला का हमीभाव दिला नाही?. शरद पवार कृषीमंत्री असताना देखील कांद्याचे भाव पडले होते" महायुतीमध्ये शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आहेत. भाजपाने त्यांच्याकडे आधीपासूनच असलेल्या 20 उमेदवारांची नाव दुसऱ्या यादीत जाहीर केली.
नाशिक : “आम्ही शरद पवार यांचे फोटो कुठेही वापरले नाहीत. चिन्ह सध्या आमच्याकडे, त्यामुळे आम्ही ते वापरणारच. मी स्वतः शरद पवार यांचे फोटो कुठेही वापरले नाहीत. शरद पवार यांचे फोटो दाखवा आणि मत मिळवा असे मी कुठेही म्हणालेलो नाही. प्रचार करण्यासाठी अजून वेळेच आलेली नाही. निवडणूक अजून लागलेली नाही” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ म्हणाले. “शरद पवार कृषिमंत्री असताना कांद्याला का हमीभाव दिला नाही?. शरद पवार कृषीमंत्री असताना देखील कांद्याचे भाव पडले होते. कांद्याचे दर पडले आहेत हे खर आहे”असं छगन भुजबळ म्हणाले. मनसेसोबतच्या युतीबद्दल बोलण्यास छगन भुजबळ यांनी टाळलं. “मनसे महायुतीमध्ये आल्यास फायदा होईल का नाही? यावर माझा अभ्यास नाही” असं छगन भुजबळ म्हणाले. नाशिकमध्ये छगन भुजबळ यांची ताकद आहे. त्यामुळे मनसेबद्दल त्यांची भूमिका सुद्धा महत्त्वाची असेल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे या आठवड्यात नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी परस्पर हेमंत गोडसे लोकसभेचे उमेदवारी असतील, असं जाहीर करुन टाकलं. खरतर महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाहीय. महायुतीमध्ये शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आहेत. भाजपाने त्यांच्याकडे आधीपासूनच असलेल्या 20 उमेदवारांची नाव दुसऱ्या यादीत जाहीर केली. पण सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या तिढा असलेल्या जागांवर उमेदवारांची नाव जाहीर केली नाहीत. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी परस्पर उमेदवार जाहीर केल्याने महायुतीमध्ये नाराजी आहे. “नाशिकची जागा जाहीर करण्याचा श्रीकांत यांना अधिकार नाही, थोडी शिस्त पाळली पाहिजे” असं छगन भुजबळ म्हणाले.
स्वतः जयंत पाटील अनेकांच्या संपर्कात
शरद पवार गटातील जयंत पाटील यांच्याबद्दलही भुजबळांनी वक्तव्य केलं. “स्वतः जयंत पाटील अनेकांच्या संपर्कात आहेत, त्यावर निर्णय होऊदे मग नंतर बघू” असं ते म्हणाले. MIM च्या निवडणूक लढण्याबद्दल म्हणाले की, ‘लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणुका लढवण्याचे अधिकार आहेत’