युती धर्मात वादाचा मोठा खडा? शहाजी बापू पाटलांच्या आमदारकीवर आबांचा दावा
सांगोला मतदारसंघात ब्रह्मदेव जरी आला तरी आपण लढणार अशी भूमिका अजित पवार गटाच्या दिपक साळुंखेंनी घेतलीय. त्यामुळे युतीधर्मात शिंदे गटाच्या शहाजी बापू पाटलांचं काय होणार? याची चर्चा सुरु झालीय.
रवी लव्हेकर, टीव्ही 9 मराठी, सोलापूर | 25 नोव्हेंबर 2023 : ज्या उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आमदारांनी बंड केलं, तेच अजित पवार आता शिंदेंच्या सोबत सत्तेत आहेत. मात्र मतदारसंघांचं काय होणार? हा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. कारण जी भीती गुवाहाटीला गेल्यानंतर शहाजी बापूंनी वर्तवली होती, तीच भीती आता अजित पवारांचा गट सोबत असूनही कायम आहे. कारण पंढरपुरातल्या सांगोल्यातून शिंदे गटाचे नेते शहाजी पाटील आमदार आहेत. मात्र आता तिथून अजित पवार गटाच्या दिपक साळुंखेंनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्याचा निश्चय केलाय, म्हणून युतीधर्मात सांगोल्यावरुन खटका पडण्याची चिन्हं आहेत.
2019 मध्ये सांगोल्याची निवडणूक अतिशय रंजक झाली होती. सांगोल्यात शेकापचे दिवंगत नेते गणपतराव देशमुखांचं 50 वर्षे एक हाती वर्चस्व होतं. एक अपवाद वगळला तर 1972 पासून ते सलग सांगोल्यातून आमदार राहिले. 2019 गणपतराव देशमुखांच्या निधनानंतर शेकापनं आधी भाऊसाहेब रुपनवरांची उमेदवारी जाहीर केली. नंतर मात्र रुपनवरांऐवजी गणपतराव देशमुखांचे नातू अनिकेत देशमुखांनी तिकीट दिलं गेलं.
यावरुन राष्ट्रवादीही नाराज झाली, आणि राष्ट्रवादीच्या दिपक साळुंखेंनी शहाजी पाटलांनाच पाठिंबा देऊन टाकला. गंमत म्हणजे या निवडणुकीत स्वतः दिपक साळुंखे राष्ट्रवादीचे उमेदवारही होते. मात्र स्वतः उमेदवार असूनही त्यांचा पाठिंबा शहाजी पाटलांना होता.
शिवसेनेच्या शहाजी पाटलांना 99464 मतं मिळाली. शेकापच्या अनिकेत देशमुखांना 98 हजार 696 मतं मिळाली होती. अर्ज भरुन शहाजी पाटलांना पाठिंबा दिलेल्या राष्ट्रवादीच्या दिपक साळुंखेंना 915 मतं मिळाली होती. रंजक म्हणजे शहाजी पाटलांचा अवघ्या 768 मतांनी विजय झाला. दरम्यान, दिपक साळुंखेंच्या दाव्यावर शहाजी पाटलांना दोन दिवसानंतर प्रतिक्रिया देणार असल्याचं म्हटलंय. मात्र मविआतून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादीतून सुटका झाल्याचा दावा करणाऱ्या शहाजी पाटलांपुढे अद्यापही तीच स्थिती असल्याचं दिसतंय.