जळगाव: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सध्या भलतेच फॉर्मात आहेत. गेल्या काही दिवसांपासून खडसे यांची तोफ विरोधकांवर चांगलीच धडधडत आहे. आता त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे. मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार होतो. त्यामुळेच माझ्यावर अत्याचार करण्यात आला. जो माणूस पक्षासाठी 40 वर्ष देतो तो मुख्यमंत्रीपदाचा दावेदार होऊ शकत नाही काय? असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला आहे.
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी एका सभेला संबोधित करताना हा सवाल केला आहे. मी भाजपचा पक्का होतो. विरोधी पक्षनेता असताना सरकारला धारेवर आणून सोडलं होतं. त्यामुळे एक वातावरण तयार झालं होतं. मात्र मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार असल्याने माझ्यामागे भूखंड प्रकरण, ईडी लावण्यात आली, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला.
आयुष्याचे चाळीस वर्ष ज्या पक्षासाठी घातले तो मुख्यमंत्री पदाचा दावेदार का होऊ शकत नाही? असा सवाल उपस्थित करत तुम्ही आयत्या पिठावर रेघोट्या मारायला आलात, अशी टीका त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता केली.
जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत मंदा खडसे यांना पाडण्यासाठी दोन मंत्री, भाजपचे सर्व आमदार, खासदार कामाला लागले आहेत. मात्र शेर तो अकेला होता है…. झुंड मे तो गिधाड आते हैं असे म्हणत खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली.
जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत मंदाकिनी खडसे इतक्या पावरफूल आहेत की त्यांना पाडण्यासाठी दोन दोन मंत्री, भाजपचे सर्व आमदार, खासदार कामाला लागले आहेत. माझी ताकद इतकी आहे की, भाजपचे सगळे कसे माझ्या अवतीभवतीच फिरताहेत. माझ्यामुळे एवढ्या सगळ्या जणांना भिंगरी लागली आहे, यावरून मी किती पॉवरफूल आहे हे दिसून येतं, असा टोला त्यांनी लगावला.
जय पराभव हा नंतरचा विषय आहे. तुम्हाला मी एकटाच काफी आहे, असं म्हणत त्यांनी विरोधकांना प्रति आव्हानच दिलं आहे.
माझ्या मागे इडी, सीबीआय लावली. माझ्या जावयाला जेलमध्ये टाकलं. आता मला आणि माझ्या बायकोला जेलमध्ये टाकण्यासाठी यांचे षडयंत्र सुरू आहे. एखाद्या छळण्यासाठी एखादी यंत्रणा कशी काम करते याच हे उदाहरण आहे. सत्तेचा माज आणि मस्ती सुरू असून मला बघून घेईन म्हणतात. मात्र मी पण आता बघूनच घेईन, असा इशाराही त्यांनी दिला.