कुछ नही होनेवाला है, मै तुम्हारे उरा पे बैठनेवाला हूँ; नाथाभाऊ कडाडले

| Updated on: Oct 28, 2022 | 10:10 AM

एकनाथ खडसे यांनी परवाच शिंदे गटाचे आमदार शहाजी बापूंवर टीका केली. शहाजीबापूंनी आपली पूर्वीची स्थिती सांगितली. बायकोला ही साडी घ्यायला पैसे नाही असे विधान त्यांनी केलं होतं.

कुछ नही होनेवाला है, मै तुम्हारे उरा पे बैठनेवाला हूँ; नाथाभाऊ कडाडले
कुछ नही होनेवाला है, मै तुम्हारे उरा पे बैठनेवाला हूँ; नाथाभाऊ कडाडले
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

जळगाव: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिला आहे. विरोधक रोज म्हणतात कुछ ना कुछ होनेवाला है. मात्र, कुछ नही होनेवाला है. मै तुम्हारे उरा पे बैठनेवाला हूँ. मला कितीही त्रास दिला तरी मी सर्वांच्या ऊरावर बसेन, असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला आहे. रावेर तालुक्यातील ऐनपूर येथील राष्ट्रवादीच्या (ncp) जनसंवाद यात्रेला संबोधित करताना त्यांनी हा इशारा देतानाच सरकारवर (maharashtra government) जोरदार टीका केली.

विरोधकांकडून सातत्याने छळ करून मला अडकविण्यात येत आहे. काही ना काही खोटे नाटे करून मला जेलमध्ये टाकायचे आणि निवडणुका सुरळीत करायच्या, असा त्यांचा प्रयत्न आहे. पण तुम्हा जनतेच्या आशीर्वादाने मी सर्वांना पुरून उरेल, असे म्हणत एकनाथ खडसेंनी सरकारला आव्हान दिले आहे. माझा कितीही छळ केला. मला कितीही त्रास दिला तरी मी सर्वांच्या ऊरावर बसेन, असा हल्लाबोलही त्यांनी सरकारवर केला.

हे सुद्धा वाचा

रवी राणा आणि बच्चू कडू वादावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राणांनी बच्चू कडूंवर खोके घेतल्याचा आरोप केला आहे. त्यावर बच्चू कडू यांनी पुराव्यानिशी आरोप सिद्ध करण्याचं आव्हानच दिलं आहे. बच्चू कडू यांनी आपल्या संपर्कात सात ते आठ आमदार असून पुरावे नाही दिले तर निर्णय घेण्याचा इशाराही दिला आहे. त्यांनी एकप्रकारे सरकारलाच आव्हान दिलं आहे. बच्चू कडू यांची ही सुरुवात आहे. त्यामुळे शिंदे गटात गेल्या बंडखोरांमध्ये अस्वस्थता आहे. हळूहळू ही अस्वस्थता बाहेर येत आहे. बच्चू कडू यांच्या माध्यमातून ही सुरुवात आहे, असा दावा खडसे यांनी केला.

दरम्यान, काल मुक्ताईनगरच्या अनेक खडसे समर्थक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे सोशल मीडिया प्रमुख युवराज पाटील, मुक्ताईनगर चे राष्ट्रवादी तालुका सरचिटणीस वाय डी पाटील, प्रशांत पाटील यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली.

मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर विश्वास ठेवत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. तर रावेर तालुक्यात राष्ट्रवादीच्या सभे आधीच कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने खडसे यांना मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी परवाच शिंदे गटाचे आमदार शहाजी बापूंवर टीका केली. शहाजीबापूंनी आपली पूर्वीची स्थिती सांगितली. बायकोला ही साडी घ्यायला पैसे नाही असे विधान त्यांनी केलं होतं. आपल्या बायकोलाही जो माणूस साडी घेऊ शकत नाही तो मर्द कसला? मात्र शहाजी बापूंनी जे म्हटलं ते कोणत्या हेतूने म्हटलं हे मला माहिती नाही. शहाजी बापूंची परिस्थिती आमदार झाल्यापासून सुधारली. त्यामुळे त्यांना आता कोणाकडे आशेने बघण्याची आवश्यकता नाही, असं ते म्हणाले.