…तर एकनाथ खडसे यांच्या संपत्तीचा लिलाव होईल; गिरीश महाजन यांच्या दाव्याने खळबळ
आपल्यावर अन्याय झाला आहे. आपण पवित्र आहोत असे आज खडसे म्हणत आहेत. भाजप पक्षाला नालायक म्हणत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यासोबत गलिच्छ राजकारण केलं असेही ते म्हणतात. माझ्यावर सुद्धा खालच्या स्तराची भाषा वापरून आम्हाला दोष देतायत. परंतू यात आमची काय चुकी ? असाही सवाल गिरीश महाजन यांनी केला आहे.
जळगाव | 5 फेब्रुवारी 2024 : भाजपातून राष्ट्रवादीत गेलेले नेते एकनाथ खडसे यांच्यावर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी हल्लाबोल केला आहे. गौण खनिज घोटाळ्यात एकनाथ खडसे यांच्या सहभागाबद्दल बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी हा हल्ला बोल केला आहे. एकनाथ खडसे केवळ चोरी केलेली नाही, तर शासनाच्या तिजोरीवर अक्षरश:137 कोटींचा दरोडा टाकला असल्याचा आरोप मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. खडसे यांनी दंडाची रक्कम जर भरली नाही तर त्यांच्या मालमत्तेचा लिलाव तर होईलच शिवाय त्यांच्या कुटुंबातील कोणीही निवडणूक लढवू शकणार नाही असे महाजन यांनी म्हटले आहे.
एकनाथ खडसे यांनी महाजन महसूल मंत्री असताना त्यांनी गौण खनिज घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. एक रुपया रॉयल्टी न भरता शासनाचे 137 कोटी रुपये खडसे यांनी हडप केल्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. गौण खनिज घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसेंच्या मालमत्तांवर बोजा चढवल्याच्या विषयावर बोलताना गिरीश महाजन यांनी खडसे यांनी शासनाच्या तिजोरीवर 137 कोटीचा दरोडा टाकला असल्याचा आरोप केला आहे.
भ्रष्टाचाराचे कुलगुरू आहेत
कुणाकडे एक रूपयांची बाकी असली तरी तो निवडणूक लढवू शकत नाही. खडसे कुटुंबाकडे तर 137 कोटीची वसुली बाकी आहे. त्यांना हा दंड भरावाच लागेल, अन्यथा त्यांच्या प्रॉपर्टीचा लिलाव तर होईलच शिवाय ते निवडणूकही लढू शकणार नाहीत. त्यांनी चोरी नव्हे तर डाका टाकला असून ते ‘भ्रष्टाचाराचे कुलगुरू’ आहेत ! अशा शब्दांमध्ये राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. भोसरी प्रकरणात सुद्धा खडसेंना 27 कोटींचा दंड झालेला आहे. त्यामध्ये सुद्धा सहा वर्षापर्यंत त्यांची कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी ते विकू शकत नाहीत अशा आशयाचे पत्र सर्व रजिस्टर कार्यालयांमध्ये देण्यात आलेले असल्याचे महाजन यांनी म्हटले आहे.
एकनाथ खडसे स्वार्थी माणूस
एकनाथ खडसे हा स्वार्थी माणूस आहे, दुसऱ्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप करताना चार बोटं आपल्याकडे सुद्धा असतात हे खडसेंना माहीत नसावे.खडसेंना असे वाटले मांजर दूध पिते तर त्याला कोणी बघत नाही संपूर्ण डोंगर पोखरून खडसे परिवार यांनी 137 कोटींचा डल्ला शासनाच्या तिजोरीवर मारलेला आहे असा एसआयटीच्या रिपोर्ट असून त्यावरून ही माहीती सांगत असल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.