महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? जयंत पाटील यांनी घेतली अमित शाह यांची भेट?; शरद पवार यांना मोठा धक्का
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे जयंत पाटील हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुणे | 6 ऑगस्ट 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे जयंत पाटील हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसे झाल्यास राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासाठी हा दुसरा सर्वात मोठा धक्का असणार असल्याचं सांगितलं जात आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कालपासून पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी जयंत पाटील यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. आज सकाळीच ही भेट झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील जेडब्ल्यू मेरिएट हॉटेलमध्येच जयंत पाटील यांची अमित शाह यांच्याशी भेट घडवून आणल्याची चर्चा आहे.
तासभर खलबतं
या बैठकीला हे चौघेच नेते होते. इतर कोणताही नेता नव्हता. एक तासभर या चारही नेत्यांमध्ये चर्चा झाली. विशेष म्हणजे या भेटीवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही नव्हते. मुख्यमंत्री शिंदे पुण्यात असूनही ते या चर्चेवेळी नव्हते, अशी माहिती सूत्रांनी दिली. जयंत पाटील हे लवकरच अजित पवार गटात सामील होणार असून त्यांना पुढील आठवड्यात होणाऱ्या विस्तारात महत्त्वाचं मंत्रीपदही जाऊ शकतं, असं सूत्रांनी सांगितलं.
शरद पवार यांना धक्का?
अजित पवार यांच्यानंतर जयंत पाटील यांनी बंड केल्यास शरद पवार यांच्यासाठी तो सर्वात मोठा धक्का असेल. जयंत पाटील हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. ज्यावेळी शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, तेव्हा पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा म्हणून जयंत पाटील यांनी सर्वाधिक आग्रह धरला होता. पवारांनी राजीनामा दिल्याने व्यथित झालेल्या पाटील यांना अश्रूही आवरता आले नव्हते. तर शरद पवार यांनी आमच्या सर्वांचे राजीनामे घ्यावेत, त्यांना पाहिजे ते करावे, पण राजीनामा मागे घ्यावा, असं आग्रही त्यांनी धरला होता. असं असताना जयंत पाटील यांनी साथ सोडल्यास शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का असणार आहे.
जयंत पाटील बोलणार
दरम्यान, जयंत पाटील हे अमित शाह यांना भेटल्याची जोरदार चर्चा आहे. त्यावर जयंत पाटील दुपारी बोलणार आहेत. जयंत पाटील हे शाह यांच्या भेटीचं वृत्ताचा स्वीकार करतात की वृत्त फेटाळून लावतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.