जयंत पाटील यांनी मंत्री अनिल पाटील यांना डिवचलं, म्हणाले, ‘फक्त अमळनेरचा प्रश्न सोडवून दाखवा’
"राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालं. मात्र मदत आणि पुनर्वसन मंत्री अधिकाऱ्यांना सांगू शकत नाहीत कारण ते सरकारमध्ये नवीन आहेत", असा टोला जंयत पाटील यांनी लगावला. "अनिल पाटील यांना निर्णय घेण्याचा अधिकार नाही सरकारमध्ये ज्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे त्यांच्याशी अनिल पाटील यांच्याशी भेट झालेली नसेल", असाही टोला त्यांनी लगावला.
किशोर पाटील, Tv9 मराठी, जळगाव | 30 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्यावर टीका केलीय. “मदत आणि पुनर्वसन खातं जळगाव जिल्ह्यात आहे. विदर्भातील बुलढाणामध्ये शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं. नाशिकमध्ये द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं. मदत – पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी मदत पोहोचवायला पाहिजे. अनिल पाटील हे सरकारमध्ये नवीन आहेत. ते अधिकाऱ्यांना सांगू शकत नाहीत. सरकारमध्ये ज्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे त्यांच्याशी अनिल पाटील यांची भेट झालेली नसेल”, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी टोला लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाच्या वतीने जळगावात आज शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. मोर्चाचं जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभेत रूपांतर झाल्यानंतर या सभेत भाषणात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंत्री अनिल पाटील यांच्यावर निशाणा साधला.
जयंत पाटील यांचं अनिल पाटलांना आव्हान
“मंत्र्यांनी किमान या जळगाव जिल्ह्यात ज्या-ज्या शेतकऱ्यांचा नुकसान झाले त्यांचा विमा ताबडतोब मिळवून दाखवा , किमान मंत्र्यांनी त्यांचा अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना जरी मदत मिळवून द्यावी. नुसता अमळनेर तालुक्याचा जरी प्रश्न सोडवला तरी आम्हाला चालेल”, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी मंत्री अनिल पाटील यांना थेट आव्हान दिलं.
जयंत पाटलांचं जळगावच्या तीनही मंत्र्यांवर निशाणा
“जळगाव जिल्ह्यात तीन-तीन मंत्री असतानाही शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीय. तीनही मंत्र्यांनी ताकद लावावी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावे, असं म्हणत जयंत पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील आणि अनिल पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला. जळगाव जिल्ह्यात केळीचा प्रश्न आहे, दुष्काळाचा प्रश्न आहे, पीक विम्याचे प्रश्न आहेत, तसेच कापसाला 12 हजार भाव मिळावा, अशी आमची मागणी आहे. या प्रश्नांसाठी जळगाव जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांनी ताकद लावावी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत”, असं जयंत पाटील म्हणाले.