मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मतदारसंघ सोडावा लागणार? राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा
कल्याण लोकसभा मतदारसंघावरुन महायुतीत धुसफूस असल्याची चर्चा सातत्याने सुरु असते. या चर्चांनंतर आमदार गणपत गायकवाड यांचं एक वक्तव्य समोर आलं. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे. त्यामुळे आगामी काळातल्या घडामोडी महत्त्वाच्या असणार आहेत.
विवेक गावंडे, Tv9 मराठी, अमरावती | 4 डिसेंबर 2023 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. प्रत्येक पक्ष रणनीती आखत आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवला जात आहे. असं असताना आता सत्ताधारी शिवसेना आणि भाजपच्या लोकसभा मतदारसंघावरुन वेगवेगळे दावे केले जात आहेत. कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी नुकतंच कल्याण आणि भिवंडी लोकसभेत आमचे जे उमेदवार उभे राहतील ते 100 टक्के निवडून येतील, असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे सध्या कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. ते दोन वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. गणपत गायकवाड यांच्या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचं वक्तव्य समोर आलं आहे. भाजपकडून कल्याण मतदारसंघावर दावा केला जाऊ शकतो, असा दावा रोहित पवार यांनी केलाय.
भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीचा अजेंडा ठरवण्याच्या सूचना दिल्याची चर्चा आहे. यातून शिंदे गटाच्या काही जागा बदलल्या जातील अशी चर्चा आहे. शिंदे गट आणि भाजपला प्रत्येक 11 जागा देण्यात येतील अशी माहिती आहे. याबाबत रोहित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. “अजित दादा मित्र मंडळाला किती जागा मिळतील हे सांगता येणार नाही. कारण अजित दादा बोलत असताना त्यांनी केवळ 4 जागांची माहिती घेतली. त्याचबरोबर जे काही रिशेफलिंग होईल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघाकडे भाजपचा डोळा आहे. त्यामुळे ती जागा शिंदे गटाला सोडावी लागेल”, असा दावा रोहित पवारांनी केला.
‘बावनकुळे जे म्हणाले हे त्याचे संकेत’
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वानखेडे स्टेडीयमवर पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. देवेंद्र फडणवीस एकटा वाघ आहे, बाकी कुणी वाघ नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रेशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. बावनकुळे यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “याची काळजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करावी. अजित दादा मित्र मंडळाचे सर्व नेत्यांनी याची काळजी करावी. आम्हाला काही वाटत नाही. आम्ही हेच सांगतो की, भाजप लोकनेत्यांना संपवतं. मध्य प्रदेशात भाजपला यश आलं. पण सिंधिया यांचं अस्तित्व संपवण्यात आलं आहे. तशीच परिस्थिती महाराष्ट्रात होणार आहे. बावनकुळे जे म्हणाले हे त्याचे संकेत आहेत”, असं रोहित पवार म्हणाले.
‘चांगलं आहे, मिशन 52 नाही केलं’
शिंदे गटाच्या कार्यकारिणीत मिशन 48 असं मिशन ठरवण्यात आलं आहे. याबाबत रोहित पवार यांना प्रश्न विचारण्यात आलं असता त्यांनी “चांगलं आहे, मिशन 52 नाही केलं”, असा टोला लगावला. “आता 48 धरलं असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. मिशन सामान्य घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत. महाराष्ट्र सामान्य लोकांच्या अडचणी सुटाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. ते सत्तेबद्दल बोलत आहेत. आम्ही वस्तुस्थितीबाबत बोलत आहोत”, असं रोहित पवार म्हणाले.