शरद पवार पहिल्यांदाच सभेत पाच मिनिटे बोलले; नेमकं काय म्हणाले पवार?
शरद पवार यांनी केवळ पाचच मिनिटं संवाद साधला. यावेळी त्यांचा आवाज थोडा क्षीण होता. चेहरा थोडा निस्तेज दिसत होता. तसेच त्यांनी आज आपलं भाषण उभं न राहता बसूनच केलं.
शिर्डी: राष्ट्रवादीचे (ncp) सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) हे आजारी असतानाही शिर्डीतील (shirdi) पक्षाच्या मंथन मेळाव्यात हजर झाले. यावेळी पवारांचं समारोपाचं भाषण होतं. मात्र, पवारांनी आजच्या सभेत फक्त पाचच मिनिटं भाषण केलं. कदाचित सभेत केवळ पाच मिनिटं भाषण करण्याची पवारांची ही पहिलीच वेळ असावी. प्रकृती ठिक नसल्याने त्यांनी अधिक संवाद साधला नाही. मात्र, त्यांचं लिखित भाषण राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी वाचून दाखवलं.
शरद पवार हे थेट ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन शिर्डीतील पक्षाच्या मेळाव्याला आले. यावेळी त्यांनी काही नेत्यांची भाषणं ऐकली. नंतर समारोपाचं भाषण अवघ्या पाच मिनिटात उरकलं. मला सविस्तर बोलता येणार नाही. आज सविस्तर बोलणं शक्य नाही. वैद्यकीय अधिकाऱ्याने 10 ते 15 दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर मला माझं काम करता येईल. तेव्हा मी बोलेन, असं शरद पवार म्हणाले.
तुम्ही राज्यभरातून मोठ्या संख्येनं आला आहात. शिस्तबद्ध पद्धतीने तुम्ही सर्वांचं म्हणणं ऐकून घेत आहात. राज्यात परिवर्तन घडवून आणण्याची ताकद राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात आहे. ही संधी लवकर मिळेल असी आशा आहे, असा कानमंत्रही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला.
शरद पवार यांनी केवळ पाचच मिनिटं संवाद साधला. यावेळी त्यांचा आवाज थोडा क्षीण होता. चेहरा थोडा निस्तेज दिसत होता. तसेच त्यांनी आज आपलं भाषण उभं न राहता बसूनच केलं. त्यांच्या हाताला बँडेज लावलेले दिसत होते.
शिर्डीच्या कार्यक्रमानंतर शरद पवार पुन्हा एकदा मुंबईत परतणार असून ते ब्रीच कँडी रुग्णालयात भरती होणार आहेत. त्यांच्यावर अजून दोन चार दिवस उपचार होणार असल्याचं सांगितलं जात आहे.