पत्राचाळ प्रकरणाची चौकशी लवकरात लवकर करा; शरद पवारांचं राज्य सरकारला आवाहन
वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात झाला असता तर चांगलं झालं असतं. त्याची जागाही ठरली होती. पण हा प्रकल्प इथं झाला नाही. तो गुजरातला गेला. या देशातच हा प्रकल्प होतोय. पण महाराष्ट्रात झाला असता तर आनंद झाला असता.
मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी पत्राचाळ प्रकरणावर मौन सोडलं आहे. पत्राचाळ प्रकरणाची चौकशी लवकरात लवकर करा. जितक्या लवकर करायची तेवढी करा. चौकशीला आम्ही नाही म्हणत नाही. पण पराचा कावळा करू नका, असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे. शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना पत्राचाळ (patra chawl) प्रकरणी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या बैठकीबाबत विचारण्यात आलं. तसेच ईडीने (ED) दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये तुमचं नाव आल्याचंही पवारांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यावर पवारांनी भाष्य करताना हे विधान केलं.
त्यावेळी जी बैठक झाली. त्याचे जे मिनिट आहेत. त्याची प्रत तुम्हाला देत आहे. त्यात सेक्रेटरीने सही केली आहे. त्या मिटिंगचा इतिवृत्तांत तुमच्याकडे दिला आहे. कोर्टात चार्जशीट दाखल केली. त्यात माझं नाव आहे, असं तुम्ही म्हटलं आहे. चौकशी करणारी यंत्रणा कोर्टात काय म्हणते, राज्य सरकारचं त्यावेळी जी चर्चा झाली. त्यात काय म्हटलं याचा उल्लेख जितेंद्र आव्हाडांनी केला, असं शरद पवार यांनी सांगितलं.
कुणी चौकशी करण्याची मागणी केली तर त्याला आमची ना नाही. पण चौकशी लवकर करा. चार, आठ, दहा दिवसात जेवढ्या लवकर चौकशी करायची करा. पण आरोप वास्तव आणि सत्याला धरून नसेल तर त्यावर काय भूमिका असेल असं जाहीर करा, असंही ते म्हणाले.
वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात झाला असता तर चांगलं झालं असतं. त्याची जागाही ठरली होती. पण हा प्रकल्प इथं झाला नाही. तो गुजरातला गेला. या देशातच हा प्रकल्प होतोय. पण महाराष्ट्रात झाला असता तर आनंद झाला असता. देशात हा प्रकल्प होतोय म्हणून विरोधाला विरोध करणार नाही, असंही ते म्हणाले.
राज्य सरकारने गुंतवणुकीचं वातावरण तयार केलं पाहिजे. मी मुख्यमंत्री असताना मी रोज दोन तास गुंतवणूकदारांना द्यायचो. कारण त्यावेळी गुंतवणुकीचं वातावरण चांगलं होतं. आता त्याला धक्का बसला आहे. सर्वांनी राज्याच्या हितासाठी गुंतवणुकीचं वातावरण तयार करण्यासाठी हातभार लावला पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.