एखाद्या राजकीय पक्षाला चिंता वाटत असेल तर; शरद पवारांचा नेमका टोला कुणाला?
दसरा मेळाव्याबाबत वाद निर्माण होऊ नये याची जबाबदारी ही राज्य प्रमुखांची आहे. परंपरेनुसार उद्धव ठाकरे यांनी मागणी केली असेल तर विलंब योग्य नाही. हा प्रश्न सामंजस्याने सोडवावा, असं आवाहनही त्यांनी केलं.
सुनील काळे, मुंबई: वेदांता प्रकल्प (vedanta project) महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी नाराजी दर्शवली आहे. एवढेच नव्हे तर पवारांनी राज्यातील गुंतवणुकीवरून राज्य सरकारला धारेवर धारलं आहे. राज्यात उद्योगासाठी वातावरण पोषक नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. एखाद्या राजकीय पक्षाला एखाद्या भागात चिंता वाटत असेल आणि त्यांना मेहनत घ्यावीशी वाटत असेल तर त्या वावगं काही नाही. केंद्रीय अर्थमंत्री बारामतीत (baramati) येत असतील तर चांगले आहे. पंतप्रधान आणि राष्ट्रपतीही बारामतीत येऊन गेले आहेत, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन हे विधान करतानाच ते मुख्यमंत्री असताना कशा पद्धतीने राज्यात गुंतवणूक व्हायची याकडेही सरकारचं लक्ष वेधलं आहे.
त्यांचं बारामतीत येणं केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही. त्यांना आगामी निवडणुकीची काळजी वाटत असावी. काही राज्यांमध्ये भाजपची सत्ता नाही. ते महाराष्ट्रातूनही गेले होते. भाजपला अनुकूल स्थिती दिसत नाही. म्हणून पक्ष विस्तारासाठी ते दौरे करत असावे, असा टोलाही पवार यांनी लगावला.
राज्यातील शिंदे-फडणीस सरकारने राज्यात गुंतवणुकीचं वातावरण तयार केलं पाहिजे. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो, तेव्हा अनेक गुंतवणूकदार येत होते. या गुंतवणूकदारांना मी रोज दोन तास द्यायचो. त्यांना विश्वास द्यायचो. राज्यात गुंतवणूक व्हावी यासाठी प्रयत्न करायचो. त्यावेळी गुंतवणुकीचं वातावरणही चांगलं होतं. आता या वातावरणाला धक्का बसला आहे, असं शरद पवार म्हणाले.
राज्यात पुन्हा एकदा गुंतवणुकीचं वातावरण तयार करण्यासाठी सर्वांनी हातभार लावला पाहिजे, असंही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी वेदांता प्रकल्पावरून त्यांनी राज्य सरकारला टोले लगावले. राज्यात हा प्रकल्प झाला असता तर चांगला झाला असता. हा प्रकल्प कुठे करायच्या त्याची जागाही पाहिली होती. पण हा प्रकल्प गुजरातला गेला. शेवटी हा प्रकल्प आपल्याच देशात होतोय. मात्र, हा प्रकल्प महाराष्ट्रात झाला असता तर आनंद झाला असता असं सांगतानाच या प्रकल्पावरून आम्ही विरोधाला विरोध करणार नाही, असंही ते म्हणाले.
दसरा मेळाव्याबाबत वाद निर्माण होऊ नये याची जबाबदारी ही राज्य प्रमुखांची आहे. परंपरेनुसार उद्धव ठाकरे यांनी मागणी केली असेल तर विलंब योग्य नाही. हा प्रश्न सामंजस्याने सोडवावा, असं आवाहनही त्यांनी केलं.
मागील सरकारमध्ये जे मंत्री होते, ते सध्या मागच्या सरकारमध्ये हे हे झाले नाही असे सांगतात. मग त्यांनी त्यावेळी सत्तेचा त्याग का केला नाही? त्यावेळी का नाही काही बोलले? असा सवाल त्यांनी केला.