भाजप-शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्याला दणका, राष्ट्रवादीतून अखेर बडतर्फ
राष्ट्रवादीत असूनही भाजप आणि शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या या नेत्याची अखेर पक्षातून हक्कालपटी करण्यात आली आहे. कोण आहे तो नेता?
जळगाव : पक्षासोबत बंडखोरी करत भाजप-शिंदे गटाला पाठिंबा दर्शवणाऱ्या राष्ट्रवादीच्या संजय पवार यांना पक्षाने दणका दिला असून पक्षातून बडतर्फ केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे संजय पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असतानाही त्यांनी जिल्हा दूध संघाची निवडणूक असो की जिल्हा बँकेची निवडणूक, या दोन्ही निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच आपल्या पक्ष सोबत बंडखोरी करत संजय पवार यांनी भाजप शिंदे गटाला पाठिंबा दर्शवला होता.
भाजप आणि शिंदे गटाच्या पाठिंब्यावरच संजय पवार हे नुकतेच जिल्हा बँकेत अध्यक्ष सुद्धा झाले होते. जिल्हा बँकेच्या अध्यक्ष म्हणून ते गेल्या काही दिवसांपासून कार्यभार सुद्धा पाहत होते. सततच्या पक्षासोबत बंडखोरी या कारणामुळे जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून वरिष्ठ पातळीवर तक्रारी सुद्धा करण्यात आल्या होत्या. या सर्व तक्रारींची दखल घेत संजय पवार यांना आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी याबाबतच्या पत्र जारी केले आहे.
दरम्यान जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी आज गिरीश महाजन यांना वर्तमानपत्रातील जाहिरातीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या होत्या. यात त्यांनी चक्क शरद पवार आणि अजित पवार यांचा फोटो वापरला होता. यासोबत त्यांनी शरद पवार यांचा मोदींसोबत तर अजित पवार यांचा देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यासोबत फोटो टाकला होता. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.
आजच्या या प्रकाराची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने गंभीर दखल घेतली. दुपारी पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी एका पत्राच्या माध्यमातून संजय पवार यांना बडतर्फ करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.