अब्दुल सत्तार यांच्याविरोधात पेन ड्राईव्हमधून पुरावा, कोणत्या पोलीस ठाण्यात नोंदवली तक्रार?; हकालपट्टीवर राष्ट्रवादी ठाम
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या मुंबईतील सरकारी बंगल्यावर जोरदार आंदोलन केलं. काहींनी दगडफेक करत सत्तार यांच्या बंगल्याच्या काचा फोडल्या.
मुंबई: शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार पुरते अडचणीत सापडले आहेत. राष्ट्रवादीच्या (एनसीपी) खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अपशब्द वापरल्याने सत्तार चांगलेच अडचणीत सापडले आहेत. आपल्या या विधानावर त्यांनी माफी मागितली तरीही राष्ट्रवादीने आंदोलन (प्रोटेस्ट) सुरूच ठेवले आहे. माफी मागून चालणार नाही. सत्तारांनी राजीनामाच दिला पाहिजे, असं राष्ट्रवादीने म्हटलं आहे. तसेच सत्तार यांच्या विरोधात राष्ट्रवादीने पोलीस ठाण्यात (पोलीस स्टेशन) तक्रारही दाखल केली आहे. त्यामुळे सत्तार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीचे नेते महेश तपासे यांनी या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एका महिला खासदाराला सत्तार यांनी शिवीगाळ केली आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तार यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी, अन्यथा आम्ही महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करू, असा इशारा महेश तपासे यांनी दिला आहे.
या प्रकरणी मी फोर्टमधील माता रमाबाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांना शिवी दिली आहे. त्याचा पुरावा आम्ही पेनड्राईव्हमधून पोलिसांना दिला आहे. आता माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाणे आपल्या नावाला जागेल आणि कारवाई करेल अशी अपेक्षा आहे, असं तपासे म्हणाले.
अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी सत्तार यांच्याविरोधात तक्रार नोंदवण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. माता रमाबाई नगर पोलीस ठाण्यापाठोपाठ आता बोरिवली पोलीस ठाण्यातही सत्तार यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात येत आहे.
राष्ट्रवादीचे उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष अॅड. इंद्रपाल सिंग हे अब्दुल सत्तार यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी बोरिवली पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. अब्दुल सत्तार यांच्यावर एफआयआर नोंदवून कारवाई न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करू, असा इशारा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या मुंबईतील सरकारी बंगल्यावर जोरदार आंदोलन केलं. काहींनी दगडफेक करत सत्तार यांच्या बंगल्याच्या काचा फोडल्या. सत्तारांच्या घराबाहेर राडा करणाऱ्यांना कफ परेड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण आणि महेबूब शेख यांना देखील पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आहे. या आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.