नगरमध्ये सुजयला राष्ट्रवादीकडून अरुणकाका भिडणार?
अहमदनगर : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी काल (12 मार्च) भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, सुजय हे दक्षिण नगरमधून लोकसभा लढवणार हेही निश्चित झाले आहे. त्यामुळे सुजय विखेंविरोधात राष्ट्रवादीकडूनही तोडीस तोड उमेदवाराचं नाव चर्चेत आलं आहे. राष्ट्रवादीचे विधानपरिषदेतील आमदार अरुण जगताप हे सुजय विखेंविरोधात लोकसभा लढवण्याची […]
अहमदनगर : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी काल (12 मार्च) भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, सुजय हे दक्षिण नगरमधून लोकसभा लढवणार हेही निश्चित झाले आहे. त्यामुळे सुजय विखेंविरोधात राष्ट्रवादीकडूनही तोडीस तोड उमेदवाराचं नाव चर्चेत आलं आहे. राष्ट्रवादीचे विधानपरिषदेतील आमदार अरुण जगताप हे सुजय विखेंविरोधात लोकसभा लढवण्याची दाट शक्यता आहे. किंबहुना, आजच राष्ट्रवादीकडून अरुण जगताप यांच्या नावाची अधिकृत घोषणाही होऊ शकते.
विशेष म्हणजे, अहमदनगरमधील भाजपचे महत्त्वाचे नेते मानले जाणारे आमदार शिवाजी कर्डिले हे राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप यांचे व्याही आहेत. म्हणजेच, अरुण जगताप यांचे सुपुत्र आमदार संग्राम जगताप यांची पत्नी ही शिवाजी कर्डिले यांची कन्या आहे. त्यामुळे नगरमध्ये कर्डिले आणि जगताप कुटुंबात येत्या लोकसभेच्या निमित्ताने धर्मसंकट उभं राहण्याची शक्यता आहे.
कोण आहेत अरुण जगताप?
अरुण जगताप हे राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे विद्यमान आमदार आहेत. राष्ट्रवादीचे विधानसभेचे आमदार संग्राम जगताप यांचे ते वडील आहेत. भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांची मुलगी ही संग्राम जगताप यांची पत्नी आहे. नगर महापालिका निवडणुकीत केडगावमध्ये शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडात या सर्वांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी आमदार संग्राम जगताप यांना अटक झाली होती तर अरुण जगताप पसार होते. अरुण जगताप यांनी विधानपरिषद निवडणुकीदरम्यान सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपलं शिक्षण चौथी पास इतकं दिलं आहे.
सुजय विखे भाजपमध्ये!
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने थेट विरोधी पक्षनेत्याच्या घरातच खिंडार पाडली. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनाच पक्षात घेऊन भाजपने मोठी खेळी खेळली आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे पाटील हे लढण्यास इच्छुक होते. मात्र ही जागा आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला येत असल्याने, सुजय विखे पाटलांची गोची झाली होती. अखेर लोकसभा लढण्याचं निश्चित केलेल्या सुजय विखेंनी भाजपचं ‘कमळ’ हाती घेतलं आणि काल (12 मार्च) मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.