“शरद पवारांना अंधारात ठेवून अजित पवार गटाने ‘हे’ कृत्य केलं”, सुप्रिया सुळेंचं बोट
"लोकसभेत मी स्वत:, अमोल कोल्हे, फैजल, श्रीनिवास पाटील आणि सुनील तटकरे असे आम्ही सदस्य आहोत. सुनील तटकरे यांच्यावर आम्ही पहिल्याच दिवशी अपात्रतेची कारवाई केली. कारण अजित पवार यांच्या शपथविधीला त्यांनी पूर्ण ताकदीने सपोर्ट केला. अजित पवार गटाच्या मंत्र्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितलं आहे की, शरद पवार यांना अंधारात ठेवून आम्ही शपथ घेतली", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पुणे | 23 नोव्हेंबर 2023 : खासदार सुप्रिया सुळे यांनी अपात्रतेच्या प्रकरणावर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. “खासदार अमोल कोल्हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटले हे मला माहिती नाही. हे मला आता तुमच्याकडूनच कळत आहे. राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे चार खासदार आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, वंदना ताई, फौजिया ताई आणि प्रफुल्ल पटेल हे आहेत. जेव्हा मणिपूरवर चर्चा झाली, मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार झाले, तेव्हा मतदानाची वेळ आली, किंवा चर्चेत भाग घ्यायची वेळ आली तेव्हा प्रफुल्ल पटेल यांनी भाजप, ज्यांची मणिपूरमध्ये सत्ता आहे, त्यांची बाजू घेतली”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“जिथे बलात्कार झाले, लोकांची घरे जाळली गेली, अशा अनेक गोष्टी झाल्या, त्याला आमचा पूर्ण विरोध आहे. या भारतात कुठल्याही महिलेचा बलात्कार होत असेल, जरी आम्ही सत्तेत असलो तरी जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. या चुकीच्या गोष्टींच्या बाजूने आम्ही मतदान करणार नाहीत. राजकारण असलं तरी काही तत्वाच्या गोष्टी देखील असतात. प्रफुल्ल पटेल यांची भूमिका पाहून आम्हाला आश्चर्य वाटलं आणि दु:ख झालं की, प्रफुल्ल पटेल यांनी भाजपला सहकार्य केलं”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
प्रफुल्ल पटेल यांच्यावर पुन्हा कारवाईची मागणी
“भाजपसोबत आमची वैचारीक लढाई आहे. प्रफुल्ल पटेल त्यांच्या बाजूने निर्णय घेत असतील म्हणून आम्ही त्यांना जुलै महिन्यातच अपात्र केलं आहे. केंद्र सरकार चुकीचे निर्णय घेतात तेव्हा प्रफुल्ल पटेल त्यांच्या बाजूने मतदानाचा निर्णय घेतात. त्यामुळे आम्ही त्यांच्याविरोधात अपात्रतेची पुन्हा मागणी केली आहे”, असं स्पष्टीकरण सुप्रिया सुळे यांनी दिली.
‘शरद पवार यांना अंधारात ठेवून त्यांनी शपथ घेतली’
“लोकसभेत मी स्वत:, अमोल कोल्हे, फैजल, श्रीनिवास पाटील आणि सुनील तटकरे असे आम्ही सदस्य आहोत. सुनील तटकरे यांच्यावर आम्ही पहिल्याच दिवशी अपात्रतेची कारवाई केली. कारण अजित पवार यांच्या शपथविधीला त्यांनी पूर्ण ताकदीने सपोर्ट केला. अजित पवार गटाच्या मंत्र्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितलं आहे की, शरद पवार यांना अंधारात ठेवून आम्ही शपथ घेतली आहे. हे तुमच्या चॅनलवरचं रेकॉर्ड गोष्ट आहे. पक्षाच्या अध्यक्षाच्या माहिती नसताना एवढा मोठा निर्णय घेता तर अर्थात अपात्रतेची कारवाई व्हायला हवी”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.