मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजकारणाची पोलखोल केली. शरद पवार यांचं राजकारण कसं धरसोडीचं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचं किती नुकसान झालं याचा गौप्यस्फोटही केला. एवढंच नव्हे तर अजित पवार यांनी शरद पवार यांना आराम करण्याचा सल्ला दिला. निवृत्त होण्याचा सल्ला दिला. अजित पवार यांच्या या भाषणाची शरद पवार यांनीही चिरफाड केली. जे गेले त्यांना जाऊ द्या. त्याची चिंता करू नका. त्यांना सुखात राहू द्या. महाराष्ट्रात आपण नवीन कर्तृत्वान पिढी तयार करू, असं सांगत अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, असं आवाहनही शरद पवार यांनी केलं.
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये मेळावा पार पडला. यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. चिन्ह कुठे जाणार नाही. चिन्ह काही निवडणूक ठरवत नाही. माझा अनुभव आहे. गाय वासरू, बैलजोडी, चरखा, पंजावर आम्ही निवडणुका लढवल्या आहे. घड्याळ्यावर लढलो. काही फरक पडला नाही. कुणी सांगत असेल चिन्ह आम्ही घेऊन जाऊ तर चिन्हं जाऊ देणार नाही. चिन्ह जाणार नाही. जोपर्यंत सामान्य माणसाच्या अंतकरणात पक्षाचा विचार आहे. तोपर्यंत चिंता करण्याचं कारण नाही, अस शरद पवार म्हणाले.
राष्ट्रवादी भ्रष्ट आहे असं वाटतं तर काल राष्ट्वादीलासोबत का घेतलं? म्हणजे हे राज्यकर्ते पाहिजे ते बोलत आहेत. आधार नसलेल्या गोष्टी बोलत आहेत. जनमाणसात वातावरण निर्माण करत आहेत. काही लोकांनी बाजूला जाण्याचा निर्णय घेतला. त्याचं दु:ख आहे. जो राजकीय विचार मान्य नाही. त्याविरोधात जाऊन निवडणुकीत मतं घेतली. आता त्याच लोकांसोबत जाणं ही त्या मतदारांशी प्रतारणा आहे. ज्या विचारधारेला विरोध केला त्याच्यांसोबत जाणं योग्य नाही, असं ते म्हणाले.
अजित पवार गटाच्या बॅनरवर माझा फोटो होता. त्यांना माहीत आहे आपलं नाणं चालणार नाही. त्यामुळे माझा फोटो वापरला. काही लोकांनी भाषणं केली. मला गुरु म्हणाले. पांडुरंग… बडवे… कसले बडवे? कसले काय? पांडुरंगाच्या दर्शनाला कुणाला कोणीही थांबवू शकत नाही. त्यासाठी पंढरपूरलाच जायची गरज नाही. पंढरपूरला गेल्यावर बाहेरून दर्शन घेतात आणि आनंदात जातात. पांडुरंग म्हणायचं गुरू म्हणायचं आणि आमच्याकडे दुर्लक्ष झालं असं सांगायचं. गंमतीची गोष्ट आहे, असंही ते म्हणाले.
एक नेते तुरुंगात गेले. सहा महिने आत होते. आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न केला. ते तुरुंगातून आल्यावर अनेकांनी म्हटलं त्यांना संधी देऊ नका. ते तुरुंगात गेलेले आहेत. निकाल लागेपर्यंत त्यांना तिकीट नको. मी म्हटलं त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही. त्यांना तिकीट दिलं. त्यांना मंत्री केलं. पहिल्या दोन मंत्र्यांमध्ये त्यांचं नाव होतं. त्यांचा दोन दिवसांपूर्वी फोन आला. सकाळी म्हणाले, काय चाललंय. बघतो. जातो. बघून येतो म्हणून गेले अन् मंत्रीपदाची शपथ घेतली, असंही त्यांनी सांगितलं.