मुंबईः महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा उलटफेर घडवून आणणाऱ्या आजच्या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची नियुक्ती होणं म्हणजे अजून एका सातारकरांची मुख्यमत्रीपदी (Maharashtra Chief Minister) वर्णी लागली.. याचा मला आनंद आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत. ट्विटरच्या माध्यमातून शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा आज देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या. महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकण्यामागे देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्री पदी बसण्याची लालसा आहे, अशी चर्चा सर्वत्र होत होती. मात्र ऐनवेळी पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंचं नाव पुढे केलं आणि राष्ट्रवादी, काँग्रेस सह शिवसेनेचे नेतेही चक्रावून गेले. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील आणखी एकजण मुख्यमंत्री झाला, असं समाधान शरद पवार यांनी व्यक्त केलं.
गुरुवारी संध्याकाळी साडे सात वाजता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, अशी घोषणा देवेंद्र फडवणीस यांनी केली. त्यानंतर विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. शरद पवार यांनीही ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली. स्व. यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर आणखी एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा मला अभिमान आहे. शिंदे यांची महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन. महाराष्ट्राच्या हिताची जपणूक त्यांच्याकडून होईल, अशी सार्थ अपेक्षा व्यक्त करतो…
स्व. यशवंतराव चव्हाण, श्री. बाबासाहेब भोसले, श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर अजून एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद आहे.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 30, 2022
एकनाथ शिंदेंचा मतदार संघ ठाणे असला तरीही सातारा जिल्ह्यातलं दरे हे त्यांचं मूळ गाव आहे. महाबळेश्वरपासून 70 किमी अंतरावरील हे गाव आहे. दरे गावात अवघी 30 घरं आहेत. गावाच्या एका बाजूला जंगल तर दुसऱ्या बाजूला कोयनेचे धरणक्षेत्र आहे. त्यामुळे येथे राहणारे बहुतांश लोक मजूर आहेत.
शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी फडणवीसांच्या घोषणेवर गोंधळलेली प्रतिक्रिया दिली. फडणवीसांचा हा निर्णय धक्कादायक आहे. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं तर त्यांनी हे आधी पक्षप्रमुखांशी बोलायला हवं होतं, असं त्या म्हणाल्या..
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या. भाजपचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळेच आहे. हा त्यांचा स्वभावच आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकारावर आज प्रतिक्रिया देणं चुकीचं आहे, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.