“वृत्तपत्रात अदृश्य शक्तीचा वावर… ते सांगतील तसेच छापून येते”; शरद पवार यांचा मोठा दावा
शरद पवारांनी मला पत्रकारांची काळजी वाटते, असे म्हणत पूर्वीच्या पत्रकारितेत आणि आताच्या पत्रकारितेत किती फरक असतो, याबद्दल भाष्य केले.
Sharad Pawar Press Conference : “वृत्तपत्रात येणाऱ्या बातम्या किंवा लिखाण याच्या मागे कोणती तरी अदृश्य शक्ती आहे. ही अदृश्य शक्ती त्यांना लिहायला भाग पाडते”, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केला. यावेळी त्यांनी सध्या घडणाऱ्या विविध राजकीय घटना, आरक्षण, छगन भुजबळांसोबत झालेली भेट आणि विधानपरिषदेतील पराभव या विषयी देखील भाष्य केले. यावेळी शरद पवारांनी मला पत्रकारांची काळजी वाटते, असे म्हणत पूर्वीच्या पत्रकारितेत आणि आताच्या पत्रकारितेत किती फरक असतो, याबद्दल भाष्य केले.
“मला तुमची काळजी वाटते. दिल्लीत थंडीत प्रचंड थंडी. उन्हाळ्यात प्रचंड ऊन. काही घडलं मी दिल्लीत गेलो तर माझ्या घरासमोर ३० ते ४० कॅमेरे असतात. मला वाईट वाटतं. ते तासन् तास उभे असतात. ओझं डोक्यावर घेऊन आमच्या मागे उभं असतात. ते चित्र कसं बदलायचं हे कळत नाही. पण दक्षिणेत वेगळं चित्र आहे. तिथल्या पत्रकारांची संख्या जास्त असते. ते यातना सहन करून बातमी मिळवण्याचं काम करत असतात”, असे शरद पवार म्हणाले.
ही अदृश्य शक्ती त्यांना लिहायला भाग पाडते
“काही लोक गंभीर पत्रकारिता करतात. तुम्ही सर्व्हे करतात तेव्हा तुम्ही तो गांभीर्याने केला तर त्याचा परिणाम मतदारांवर होतो. मीडियाचा आमच्या क्षेत्रात मोठा प्रभाव आहे. त्याची उपयुक्तता आहे. पण काही वेळा असं जाणवतं की, वृत्तपत्रात येणाऱ्या बातम्या किंवा लिखाण याच्या मागे कोणती तरी अदृश्य शक्ती आहे. ही अदृश्य शक्ती त्यांना लिहायला भाग पाडते. तुमच्याशी कधी तरी बोलायला संधी मिळते, तेव्हा कुठून फोन आला ते कळतं. दिल्लीत पंतप्रधान राहतात त्याचं नाव ७ रेसकोर्स असं होतं. त्या जागेशी जवळीक होती. कारण यशवंतराव चव्हाण अनेक वर्ष तिथे राहत होते. आता त्याचं नाव बदललं. लोककल्याण मार्ग ठेवलं”, असेही शरद पवार म्हणाले.
ती यंत्रणा अंत्यत प्रभावी
“पंतप्रधान निवासस्थानात आम्ही कोणी गेलो, कुणी गेलं… त्या निवासात एका बंगल्यात पंतप्रधान असतात. एका बंगल्यात कुटुंबीय असतात, एका बंगल्यात १२० विभागात पेपरचे विभाग आहेत. कोणत्या पेपरमध्ये काय लिहिलंय हे बघणारी व्यवस्था आहे. ती यंत्रणा अंत्यत प्रभावी आहे. तिचा प्रभाव सरकारी गोष्ट आणि नेतृत्वावर टिकाटप्पणी झाली तर तिथं बटन दाबलं तर पेपरच्या मालकाकडे जातं. चांगलं असेल तर सांगतात आणि चांगलं नसेल तर त्यांना भूमिका सांगितली जाते. हे बदल पूर्वी नव्हते, आता झाले आहेत”, असा मोठा गौप्यस्फोट शरद पवारांनी यावेळी केला.