मुंबई : गुजरातमधील लोकसभेच्या 26 पैकी 26 जागांवर निवडणूक लढण्याची घोषणा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने सपशेल माघार घेतली आहे. 26 पैकी केवळ एक जागा लढण्याचा निर्णय घेत, उर्वरित 25 जागांवरुन राष्ट्रवादी काँग्रेसने माघार घेतली आहे. महाराष्ट्रातील माढ्यातून पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर रंगलेल्या चर्चा थांबत नसताना, राष्ट्रवादीने गुजरातमध्ये 25 जागांवरुन माघार घेतल्याने पुन्हा एकदा सोशल मीडियासह राजकीय वर्तुळा खुमासदार चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे.
गुजरातमधून राष्ट्रवादी काँग्रेस आता 26 जागांवरुन उमेदवार उतरवण्याऐवजी फक्त एका जागेवर उमेदवार उतरवणार आहे. पंचमहाल लोकसभा मतदारसंघातून विरेंद्र पटेल यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंग वाघेला हेसुद्धा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार होते. वाघेलांना गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या विरोधात उतरवण्याची तयारी सुरु झाली होती. मात्र, त्यांनीही रिंगणातून माघार घेतली आहे.
माढ्यातून पवारांची माघार
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आधी सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारंसघातून लढण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर त्यांनी माघार घेतली. या घटनेची राज्यासह देशाच्या राजकीय वर्तुळात चर्चा झाली होती.